हद्दवाढीचे महत्त्व गावांना पटवून द्या

By admin | Published: August 1, 2016 12:27 AM2016-08-01T00:27:49+5:302016-08-01T00:27:49+5:30

विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया : हद्दवाढ अपरिहार्य; विश्वासार्हता निर्माण करावी

Confirm the importance of multiplicity to the villages | हद्दवाढीचे महत्त्व गावांना पटवून द्या

हद्दवाढीचे महत्त्व गावांना पटवून द्या

Next

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना होऊन ४० वर्षांचा कालावधी लोटला आहे. आतापर्यंत एकदाही हद्दवाढ न झाल्याने शहराचे एकूण क्षेत्र व लोकसंख्या यांचे प्रमाण व्यस्त राहीले आहे. त्यामुळे साहजिकच नागरी सोयी, सुविधांवर ताण पडत आहे. शहरातील विकसित होणाऱ्या रहिवासी, औद्योगिक व व्यापारी क्षेत्राचा ताळमेळ सध्याच्या क्षेत्रामध्ये चुकीच्या पद्धतीने घातला जात आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हद्दवाढीचा प्रस्ताव किती उपयोगी आहे, ही बाब हद्दवाढीत समाविष्ठ होणाऱ्या गावातील लोकांना समजावून सागंणे गरजेचे आहे. मात्र, यामध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी पडली आहे. योग्यरित्या फायदे-तोटे समजावून सांगितल्यास हद्दीबाहेरील गावांमधील लोकही याचे समर्थन करतील. याबाबत ‘लोकमत’ने राजकीय, सामाजिक, आर्थिक, आदी क्षेत्रांतील दिग्गजांशी संवाद साधून हद्दवाढीबाबत मत जाणून घेतले. त्यात बहुतांश दिग्गजांनी हद्दवाढीचे समर्थन केले; पण त्यात लोकांचे योग्य प्रबोधन न केल्याचा ठपका ठेवला.
हद्दवाढीने सांगलीचा काय विकास झाला? : पी.एन.
कोल्हापूर : सांगली महापालिकेने तीनवेळा हद्दवाढ केली, तिथे काय विकास झाला हे जनतेला विचारा. केवळ लोकसंख्या वाढवून विकास निधी मिळविण्याच्या नादात ग्रामीण जनतेचा जीव जाणार आहे, हे कदापि सहन करणार नसून जनभावनेच्या विरोधात निर्णय घेतला तर ‘जशाच तसे’ उत्तर देऊ, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिला.
घरफाळा, पाणीपट्टीसह सर्वच करात प्रचंड वाढ होणार आहे. त्यापटीत नागरिकांना महापालिका काय सुविधा देणार आहे. महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत त्यांना चांगल्या सुविधा देत असताना हद्दवाढीचा अट्टाहास का? शेती, दूध व्यवसायावर ग्रामीण जनता पोट भरून खात आहे, हद्दवाढ करून मोकळ्या जागा आणि शेतीवर आरक्षण टाकण्याचे षङ्यंत्र बिल्डरांचे आहे. त्यामुळे आमच्या लोकांना शेती व घरे सोडून झोपडपट्टीत राहावे लागणार आहे.
सांगली महापालिकेने तीनवेळा हद्दवाढ केली. मात्र, तिथे काय विकास झाला. लोकसंख्या वाढवून विकास करण्यापेक्षा राज्य व केंद्र सरकारने ‘विशेष पॅकेज’ देऊन विकास करावा.
नांदेडसाठी दीड हजार कोटी देत असतील तर साडेतीन शक्तिपीठापैकी एक अंबाबाईसाठी दोन हजार कोटी का मिळू शकत नाही. हद्दवाढीसाठी काही मंडळींनी प्रतिष्ठा पणाला लावली असून कृती समितीने जनभावनेचा आदर करायला हवा, असेही पाटील यांनी सांगितले. त्यांनी आपला हद्दवाढीस विरोध असल्याचे ठामपणे सांगीतले.
विकासाचा मास्टर प्लॅन गावांसमोर ठेवावा
शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेची आहे; पण, ज्या गावांना शहरात घेतले जाणार आहे तेथील लोकांचा हद्दवाढीला का विरोध होत आहे ते समजून घेणे पहिल्यांदा आवश्यक आहे. संबंधित गावांतील लोकांच्या अडचणी राज्य शासन, महानगरपालिकेने समजून घेतले पाहिजेत. त्यांच्या सोडवणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. या लोकांना विश्वासात घेऊनच हद्दवाढीचा निर्णय होणे अधिक चांगले ठरणारे आहे. हद्दवाढ झाल्यास त्यांना नेमक्या कोणत्या सुविधा मिळणार आहेत तेथील विकास कसा साधला जाणार, याची माहिती देणे महत्त्वाचे आहे. हद्दवाढीतील विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ त्यांच्यासमोर महानगरपालिकेने सादर केल्यास निश्चितपणे हद्दवाढीत येण्यासाठीचा त्यांचा विरोध होणार नाही.
- धनंजय महाडिक, खासदार
थोड्या करासाठी घाबरण्याची गरज नाही
कोल्हापूर हे जिल्ह्याचे प्रमुख शहर आहे, त्याचा विकास व्हायलाच पाहिजे. केंद्राकडून भरीव निधी येण्यासाठी साडेसात लाख लोकसंख्येची गरज आहे तेवढी लोकसंख्या होण्यासाठी जेवढी गावे लागतील तेवढीच घ्यावीत. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांंच्याशी चर्चा केली आहे. शहराशेजारील गावे बस, पाणी आदी सुविधा घेतात, मग त्यांचा शहरात येण्यास विरोध का? शहरामुळे त्यांच्या जमिनींना चांगला दर आला, मग थोडासा कर द्यावा लागतो म्हणून घाबरण्याची गरज नाही. त्याप्रमाणात त्यांचा विकासही होणार आहे. त्यामुळे साडेसात लाख लोकसंख्या होण्यासाठी आवश्यक असलेलीच शहराजावळील गावे हद्दवाढीत घेणे आवंश्यक आहे.
- हसन मुश्रीफ, आमदार
सर्वांना विश्वासात घ्या
हद्दवाढ ही काळाची गरज आहे. त्याचे फायदे काय आहेत हे लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातील लोकांना पटवून देणे गरजेचे आहे. ती जबाबदारी माझ्यावरही आहे. हद्दवाढ करताना ग्रामीण भागातील लोकांना विश्वासात घेतलेच पाहिजे. निव्वळ लोकसंख्येचा निकष या नावाखाली हद्दवाढ न करता हद्दवाढ करताना ‘मास्टर प्लॅन’ची गरज आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातून हद्दवाढीत येणाऱ्या गावांना व लोकांना होऊ शकेल. हद्दवाढ गरजेची आहे कारण त्यामुळेच नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पुणे अशी शहरे पुढे जाऊ शकली. त्याप्रमाणे कोल्हापूरही पुढे जाऊ शकेल. अन्यथा कोल्हापूरचा विकास खुंटेल. ग्रामीण लोकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.
- संभाजीराजे छत्रपती, खासदार

Web Title: Confirm the importance of multiplicity to the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.