सोशल मीडियाचे दुष्परिणाम पटवून द्या-सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:13 AM2019-01-09T01:13:07+5:302019-01-09T01:13:21+5:30
इंटरनेट नावाच्या अस्त्र आणि शस्त्राने सगळ्यांचे जीवन व्यापले आहे; सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, त्याचे दुष्परिणाम हे नव्या पिढीसमोरील मोठे संकट आहे. यापासून त्यांचे संरक्षण
कोल्हापूर : इंटरनेट नावाच्या अस्त्र आणि शस्त्राने सगळ्यांचे जीवन व्यापले आहे; सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, त्याचे दुष्परिणाम हे नव्या पिढीसमोरील मोठे संकट आहे. यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना धोक्यांची जाणीव करून देणे ही पालक-शिक्षकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी केले.
शाहू स्मारक भवनात सतेज पाटील फौंडेशन, अहान फौंडेशन व कोल्हापूर माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने चाईल्ड आॅनलाईन प्रोटेक्शन (डिजिटल गार्डियन) या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अहान फौंडेशनच्या सोनाली पाटणकर, रिस्पॉन्सिबल नेटिझमचे उन्मेष जोशी, मुख्याध्यापक संघाचे दत्ता पाटील, सुरेश संकपाळ, भरत रसाळे, अॅड. वैशाली भागवत, बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य संतोष शिंदे, बालकल्याण समितीचे सदस्य डॉ. जे. के. पवार, जयंत आसगांवकर, बाबा पाटील, आदी उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, गेल्या तीन वर्षांत ५० कोटी लोकांच्या हातात स्मार्ट फोन आला आहे; तर प्रत्येक व्यक्ती दिवसभरातील किमान २ तास १९ मिनिटे स्क्रीन टाइमवर घालविते, असे सर्वेक्षण सांगते. ‘सायबर क्राइम’सारखे दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे आपण सजग राहणे आणि नव्या पिढीला सावध करणे हाच खबरदारीचा उपाय आहे.
यावेळी संतोष शिंदे यांनी मुलांचे संगोपन, बालहक्क, अधिकार आणि संरक्षण, पोक्सो कायदा यासंबंधीचाी विस्तृत माहिती दिली. अहान फौंडेशनच्या अध्यक्षा सोनाली पाटणकर यांनी सोशल मीडियाचा गैरवापर, दुष्परिणाम, मानसिक स्थिती यांवर मार्गदर्शन केले. तुषार भागवत उन्मेष जोशी यांनी सोशल मीडियाचे जग, खेळ वास्तव यांवर विवेचन केले. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचलन , उत्पल मदाने यांनी आभार मानले.
रिस्पॉन्सिबल कोल्हापूरकर अभियान...
सोशल मीडिया वापराच्या दुष्परिणामाबाबत नव्या पिढीला माहिती असावी, यापासून होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत रिस्पॉन्सिबल कोल्हापूरकर अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोल्हापूरकर हे फेसबुक पेज तयार केले आहे. ज्यांना या अभियानाचा एक भाग बनायचा आहे त्यांनी या फेसबुक पेजला जॉईन व्हावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात सतेज पाटील फौंडेशन, अहान फौंडेशन व मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत आमदार सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबा पाटील, जयंत आसगांवकर, डॉ. जे. के. पवार, उन्मेष जोशी, संतोष शिंदे, अॅड. वैशाली भागवत, सुरेश संकपाळ, भरत रसाळे उपस्थित होते.