जप्त दारू तपासणीपूर्वीच केली फस्त, कुंपणानेच खाल्ले शेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:41 PM2021-02-24T16:41:46+5:302021-02-24T16:45:26+5:30
liquor ban Excise Department kolhapur - चार जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाणे व उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत जप्त केलेली दारू ही दारुबंदी विभागाच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली, पण ती तपासणी होण्यापूर्वीच तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पिऊन फस्त केली. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा अजब प्रकार कोल्हापुरातील ताराराणी चौकातील दारुबंदी विभागाच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत उघडकीस आला.
कोल्हापूर : चार जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाणे व उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत जप्त केलेली दारू ही दारुबंदी विभागाच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली, पण ती तपासणी होण्यापूर्वीच तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पिऊन फस्त केली. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा अजब प्रकार कोल्हापुरातील ताराराणी चौकातील दारुबंदी विभागाच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत उघडकीस आला.
याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून झालेल्या तक्रारीनुसार सात कर्मचाऱ्यांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापैकी सहा जणांना बुधवारी सकाळी अटक केली, तर एक अद्याप फरार आहे.
प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक प्रदीप विजयलाल गुजर (५८, रा. नर्मदा बंगला, ताराबाई पार्क, कोल्हापूर. मूळ रा. पुणे) यांनी तपासणीअंती मंगळवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये चौघा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील संशयित अटक कर्मचारी : वाहन चालक - वसंत भानूदास गौड (४७, रा. पिंजार गल्ली, आंबेडकर वसाहत, कसबा बावडा), वरिष्ठ सहायक -अक्षयकुमार सखाराम मालेकर (३३, रा. न्यू शाहुपुरी, सुर्वे कॉलनी), कंत्राटी कर्मचारी- मारुती अंबादास भोसले (३४, रा. शाहुपुरी २ री गल्ली), राहुल पांडुरंग चिले (३५, रा. फुलेवाडी ४ था स्टॉप), गणेश मारुती सपाटे (३०, रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ), विरुपक्ष रामू पाटील (२५, रा. विचारेमाळ, सदरबाजार). लॅब असिस्टंट मिलिंद शामराव पोटे (४९ रा. कलानगर, चंदूर रोड, इचलकरंजी) हा अद्याप गायब असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पोलीस ठाणे तसेच उत्पादन शुल्क विभागाने कारवाईत जप्त केलेली दारू ही तपासणीकरिता कोल्हापुरात दारुबंदी विभागाच्या ताराराणी चौकातील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली जाते. अशा पद्धतीने विविध कारवायांत जप्त केलेल्यापैकी सुमारे ३१ हजार १७६ रुपये किमतीची दारू ही न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली होती; पण तेथील कर्मचाऱ्यांनी संगनमताने चोरून ती फस्त केल्याचे उघडकीस आले.