विरोधच ! ग्रामसभा ठराव करणार
By admin | Published: June 28, 2015 12:51 AM2015-06-28T00:51:47+5:302015-06-28T00:52:58+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना उद्या भेटणार : विरोधी कृती समितीचा बैठकीत निर्णय
कोल्हापूर : जिल्हाधिकारी शासनाला हद्दवाढीसंदर्भात अहवाल पाठविणार आहेत. त्यामध्ये प्रस्तावित केलेल्या गावांचा विरोध असून, त्या स्वरूपाची माहिती त्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी उद्या, सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांना सर्व ग्रामसभांचे ठराव देण्याचा निर्णय शनिवारी येथे घेण्यात आला.
हद्दवाढविरोधातील दिशा ठरविण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे हद्दवाढविरोधी कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, समितीचे निमंत्रक नाथाजीराव पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
संपतराव पवार-पाटील म्हणाले, हद्दवाढीविरोधात शिस्तबद्ध रीतीने आंदोलन केले जाईल. कुणावरील आकसापोटी हे आंदोलन नाही. यापूर्वी हद्दवाढीसाठी महापालिकेने सरकारकडे पाठविलेल्या माहितीमध्ये या गावांमधील जमिनी नापीक असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे आपल्याला गावातील पिकाऊ जमीन, पशुधन यासह भौगोलिक परिस्थिती, आदी इत्थंभूत माहिती सरकारला कळवावी लागणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने ही माहिती संकलित करावी.
आमदार नरके म्हणाले, हद्दवाढीसंदर्भात जिल्हाधिकारी लवकरच सरकारला अहवाल पाठविणार आहेत. त्यामध्ये गावांचा विरोध असल्याचे नमूद व्हावे, यासाठी हद्दवाढीतील प्रस्तावित सर्व गावांचे हद्दवाढीला विरोध असणारे ग्रामसभांचे ठराव, त्याचबरोबर जिल्हा परिषद, करवीर व हातकणंगले पंचायत समित्यांचे ठराव घेऊन ते उद्या, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देऊया.
आमदार मिणचेकर म्हणाले, आम्ही हद्दवाढीविरोधात असून यासाठी नेहमीच लढा देत आलो आहे. जनरेट्याशिवाय आंदोलनाला ताकद येत नाही. हातकणंगले तालुका हद्दवाढविरोधात समितीच्या पाठीशी ठाम आहे. हद्दवाढविरोधात शेवटपर्यंत लढा देऊ.
नाथाजीराव पोवार म्हणाले, शासन व न्यायालय हे कागदावरच बोलतेय. त्यामुळे हद्दवाढविरोधात आपण आता त्याच पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. ग्रामसभांचे ठराव, सातबारा, शेती, आदी माहिती संकलित करून ती दिली पाहिजे. त्यामुळे लढ्याला बळ येईल.
प्रा. बी. जी. मांगले म्हणाले, आपण महापालिकेच्या हद्दीत राहत असलो तरी हद्दवाढीच्या विरोधात आहोत. कारण ते आम्हाला सुविधा देऊ शकत नाहीत, तर तुम्हाला काय देणार? हद्दवाढविरोधासाठी संघटित व्यासपीठ असेल तर लढाईला जोर येतो. एस. आर. पाटील यांनी सर्वच पातळ्यांवर व सर्व तयारीशी हद्दवाढीविरोधात समितीसोबत असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, राजू माने, बी. ए. पाटील, नारायण पोवार, सुरेशराव सूर्यवंशी, नंदकुमार गोंधळी, रावसाहेब दिगंबरे, सचिन चौगले, आप्पासाहेब धनवडे, प्रकाश टोपकर, दिलीप पाटील, मधुकर जांभळे, उदय जाधव यांच्यासह वीस गावांतील प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)