अंबाबाई मंदिर परिसरातून हटवल्यास संघर्ष अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 10:56 AM2021-02-09T10:56:53+5:302021-02-09T10:58:41+5:30
Muncipal Corporation Kolhapur- फेरीवाल्यांना सध्या आहे त्याच ठिकाणी पट्टे मारून व्यवसाय करण्यास देण्यात यावे. महापालिकेने जर अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवले तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिकेने कारवाई केल्यास शहरातील सर्व भाजी मंडई बंद ठेवण्याचीही भूमिका घेतली.
कोल्हापूर : फेरीवाल्यांना सध्या आहे त्याच ठिकाणी पट्टे मारून व्यवसाय करण्यास देण्यात यावे. महापालिकेने जर अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवले तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिकेने कारवाई केल्यास शहरातील सर्व भाजी मंडई बंद ठेवण्याचीही भूमिका घेतली.
महापालिका प्रशासन शहरातील अतिक्रमण कारवाईवर ठाम आहे. मंदिरे, हॉस्पिटल या परिसरातील १०० मीटरमधील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. फेरीवाल्यांचा याला विरोध आहे. यासंदर्भात फेरीवाला कृती समितीने सकाळी शिवाजी चौकात निदर्शने केली. सायंकाळी शिष्टमंडळाने आ. चंद्रकांत जाधव यांची भेट घेतली. अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका फेरीवाल्यांनी घेतली.
आ. जाधव म्हणाले, महापालिका प्रशासनाला फेरीवाल्यांना पट्टे मारून व्यवसाय करण्याची मुबा देण्याची सूचना केली आहे. आज, मंगळवारी यावर तोडगा निघेल, अशी अपेक्ष आहे अन्यथा बुधवारी प्रशासन, फेरीवाला यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल.
चौकट
फेरीवाल्यांच्या मागण्यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन बैठक घेण्याची मागणी केली. सोमवारी शिवाजी मार्केट येथील आंदोलनावेळीही बैठकीसाठी चार वेळा फोन केला. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. अंबाबाई मंदिर परिसरात ५० वर्षांपासून फेरीवाला व्यवसाय करतात. त्यांना हटवू देणार नाही. आहे तेथेच वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे पट्टे मारून व्यवसाय करू द्यावा, अन्यथा प्रशासनाशी संघर्ष अटळ असल्याचे सर्व पक्षीय कृती समितीचे आर.के. पोवार यांनी म्हटले आहे.
महापालिका प्रशासनाकडून मंदिर परिसरातील अतिक्रमणावरील कारवाईवर ठाम आहेत. या उलट फेरीवालेही येथून हटण्यास तयार नाहीत. महापालिकेने कारवाई सुरू केल्यास भाजी मंडई बंदच ठेवू, अशी टोकाची भूमिका फेरीवाल्यांनी घेतली आहे. महापालिका, फेरीवाले यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.