टर्न ओव्हर टॅक्स प्रस्तावाला विरोध
By Admin | Published: November 5, 2014 12:43 AM2014-11-05T00:43:40+5:302014-11-05T00:48:52+5:30
‘फाम’चा ठराव : मुख्यमंत्र्यांना आज भेटणार
कोल्हापूर : महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीऐवजी टर्न ओव्हर टॅक्स ही नवीन करपद्धती आणण्याची चाचपणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे. त्याला विरोधाच्या ठरावासह अन्य महत्त्वपूर्ण ठरावही फेडरेशन असोसिएशन आॅफ महाराष्ट्र (फाम)च्या मुंबई येथील बैठकीत करण्यात आले. ठरावाची माहिती देण्यासाठी उद्या (बुधवारी) मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळ भेट घेणार असून शासनाकडूनच पर्याय आल्यावर पुढील चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीऐवजी टर्नओव्हर टॅक्स ही नवीन करपद्धती आणण्याची चाचपणी नूतन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर फेडरेशन असोसिएशन आॅफ महाराष्ट्र (फाम)ने या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज मुंबईत बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरूनानी होते.
दुपारी दोनपासून सायंकाळी पाचपर्यंत झालेल्या या बैठकीत महापालिकेकडून सध्या सुरू असलेली ‘एलबीटी’ विरोधातील कारवाई स्थगित करावी. टर्न ओव्हर टॅक्सचा प्रस्ताव मागे घ्यावा. त्याचबरोबर ‘एलबीटी’ विरोधात केलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल खटले मागे घ्याव्यात, असे महत्त्वपूर्ण तीन ठराव करण्यात आले. याबाबतची माहिती उद्या (बुधवारी) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाकडून ‘एलबीटी’बाबत कोणते पर्याय दिले जातात. त्यावर पुन्हा बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
यावेळी नागपूर विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल, पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती, पुणे, मिरज, कुपवाड परिसर ‘एलबीटी’विरोधी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विराज कोकणे, समितीचे सदस्य समीर शहा, कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर, अमर क्षीरसागर, अमोल नष्टे, घन:श्याम पटेल यांच्यासह राज्यातील २६ महापालिका क्षेत्रांतील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)