अभयारण्याचे जग समजून घेतलात तरच संघर्ष संपेल --दत्तात्रय मोरसे,, चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:10 AM2019-06-02T01:10:27+5:302019-06-02T01:10:49+5:30
जंगल आणि वन्यप्राण्यांचे जग समजून घ्यायचे असेल तर आपल्याला ध्यानधारणेसारखी एकाग्रता आत्मसात करावी लागते - दत्तात्रय मोरसे
इंदुमती गणेश ।
गेल्या १६ वर्षांपासून अभयारण्याची सफर, भाषा आणि गव्यांवर संशोधन करणारे मठगाव (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय मोरसे यांच्या घोलमोड व झुंड या कादंबऱ्या पर्यावरणवादी निसर्ग साहित्य म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या झुंड कादंबरीला नुकताच तापीपूर्णा पुरस्कार जाहीर झाला. अभयारण्याची एकजीवनशैली आणि भाषा असते, ते समजून घेऊन त्यांच्याशी नातं घट्ट करा, असे प्रबोधन करणारे मोरसे यांची घेतलेली ही मुलाखत...
प्रश्न : आपली पार्श्वभूमी सांगा?
उत्तर : मी मठगाव येथील श्रीमंत क्षात्र जगद्गुरू विद्यालयात माध्यमिक मराठी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. जंगल फिरण्याची आवड पूर्वीपासूनच. त्यामुळे देशभरातील बºयापैकी अभयारण्यांना मी जाऊन आलो आहे. सध्या मराठी साहित्यातील वन्यजीव या विषयावर पीएच.डी. करीत आहे. अरण्याची भाषा, जंगल साक्षरता हे दोन नवीन उपक्रम मी सध्या राबवत आहे.
प्रश्न : गव्यांवर संशोधन करावे असे का वाटते?
उत्तर : अभयारण्यातच फिरता फिरता मी गव्यांचा अभ्यास करू लागलो. गव्यांची प्रत्येक हालचाल टिपू लागलो. अगदी दहा फुटांच्या अंतरावरून मी त्यांचे शूटिंग घेतले आहे. आता गवा थेट गावात, शिवारात येत असला, तरी पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. त्यांची सांकेतिक भाषा, जीवनशैली, हावभाव समजून घेऊ लागलो आणि त्यांच्यातील संवाद समजत गेला. गव्यांच्या या विश्वावरच ‘झुंड’ ही कादंबरी आहे.
प्रश्न : अभयारण्याची भाषा कशी समजते?
उत्तर : जंगलात प्रत्येक ऋुतूत पानांची, झाडाचे वेगवेगळे आवाज असतात, माणसाने जंगलात पाय ठेवला की प्रत्येक प्राण्याला त्याची चाहूल लागते. ते आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना धोक्याची जाणीव करून देतात, त्याला प्रतिसाद देतात. याला अरण्याची भाषा म्हणतात. प्रत्येक प्राण्याची चालण्याची पद्धत, जंगलातील वावर, आवाजातील बदल, हे सगळं म्हणजेच अरण्याची भाषा आहे.
प्रश्न : जंगल साक्षरता उपक्रमाविषयी काय सांगाल?
उत्तर : नव्या पिढीला जंगलांचे, वन्यजिवांचे महत्त्व समजावे, त्यांना जंगलाची माहिती मिळावी यासाठी मी वर्षातून ठरावीक ट्रेक आयोजित करतो. विद्यार्थ्यांना जंगलांची शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देतो. मार्गदर्शन करतो. जंगलाची-प्राण्यांची भाषा सांगतो.
मानवाचेच अतिक्रमण
गवा हा खरंतर पाला खाणारा प्राणी आहे. उगाचच मानवी वस्तीचा विध्वंस करायचा अशी प्राण्यांची मानसिकता नसते. माणसाने गव्यांच्या विश्वात अतिक्रमण केले आहे. वणवा, जंगलांचा नाश, शेतीसाठी वापरले जाणारे खत, उसावर किंवा पिकांवर फवारले जाणारे कीटकनाशक यांच्या वासामुळे गव्यांची वाट चुकते आणि त्यामुळे
ते शेतात येतात. मग गवा आणि माणसात संघर्ष होतो. संघर्ष नेमका कुणी निर्माण केला, याचे उत्तर माणूस या शब्दावर येऊन थांबते.
वन्यजीवन समजून घ्या
आजकाल जंगलात फिरायला जायची फार क्रेझ आहे. मद्यपान, पॅकेटबंद चटपटीत पदार्थ जंगलात न्यायचे. वाट्टेल तो दंगा, धुडगूस घालायचा, ठिकठिकाणी कचरा करायचा असे विध्वंसक स्वरूप या सफारीचे झाले आहे. जंगल आणि वन्यप्राण्यांचे जग समजून घ्यायचे असेल, तर आपण ध्यानधारणेला ज्या समाधी अवस्थेत जातो, ती एकाग्रता स्वत:मध्ये आणावी लागेल.