तळेवाडी येथे मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:00+5:302020-12-31T04:26:00+5:30
नेसरी : तळेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील मोहन रामजी देसाई व रामराज शरद देसाई यांनी आपणासह इतरांना मारहाण झाल्याची परस्परविरोधी ...
नेसरी : तळेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील मोहन रामजी देसाई व रामराज शरद देसाई यांनी आपणासह इतरांना मारहाण झाल्याची परस्परविरोधी फिर्याद दिल्याने नेसरी पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यातील रामराज देसाई व साथीदारांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, मोहन देसाई (वय ५८) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मंगळवारी स्वत:च्या घरी उभे असताना रवींद्र संभाजी देसाई, शरद संभाजी देसाई, रामराज शरद देसाई, शोभा शरद देसाई व हेमा रवींद्र देसाई हे जमावाने येऊन मोहन यांचे भाऊ रावसाहेब देसाई यांना तुम्ही आमच्या विरोधात तक्रार देता का ? असे म्हणून शिवीगाळ करू लागले. रवींद्र देसाई याने हातातील काठीने व रामराज याने कुऱ्हाडीने रावसाहेब यांच्या डोकीत मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी सुलोचना या गेल्या असता तिलाही रवींद्रने जमखी केले. यावेळी मोहन हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही शरद देसाई याने त्याच्या हातातील सायकलची चेन फिरवत डोकीवर व डाव्या हातावर मारहाण करून जखमी केले.
त्याचवेळी मोहन यांचा पुतण्या महेश देसाई हा कामावरून आला असता त्यास काठीने मारहाण करून शोभा देसाई व हेमा देसाई यांनी शिवीगाळ करत गळपट धरून टी शर्ट फाडून त्यास हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
रावसाहेब देसाई, सुलोचना देसाई, मोहन देसाई हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, रामराज शरद देसाई (वय २८) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मंगळवारी माझे चुलते रवींद्र देसाई व त्यांची पत्नी हेमलता देसाई यांच्यासह मला भेटण्यासाठी आले असता मोहन रामजी देसाई, रावसाहेब रामजी देसाई, महेश रावसाहेब देसाई यांनी रवींद्र यांना काठीने मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी रामराज हे घराबाहेर आले असता त्यांनाही हातातील काठीने डोकीत, पाठीवर, उजव्या दंडावर व डाव्या पायाच्या अंगठ्यावर मारहाण केली. रामराज यांची आई शोभा देसाई व चुलती हेमलता देसाई भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.