‘रेसिडेन्सी क्लब’वरील वर्चस्वासाठी प्रतिष्ठितांची झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:52 PM2017-10-05T17:52:16+5:302017-10-05T17:54:51+5:30
समीर देशपांडे
कोल्हापूर : कसबा बावड्याकडे जाताना पोस्ट आॅफिस चौक ते पितळी गणपती या रस्त्यावरून जाताना चर्चच्या पुढच्या बाजूला एक देखणी इमारत दिसते. चोख सिक्युरिटी, आतील काही दिसू नये अशी व्यवस्था आणि येणाºया-जाणाºया आलिशान गाड्या; हाच इथला प्रतिष्ठितांचा ‘रेसिडेन्सी क्लब’. या क्लबची त्रैवार्षिक निवडणूक रंगात आली आहे. शहरातील अनेक उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक, सीए, डॉक्टर, वकील असे अनेक नामवंत सभासद असलेल्या या क्लबवरील वर्चस्वासाठीची ही झुंज लक्ष्यवेधी ठरत आहे.
तत्कालीन ब्रिटिश अधिकारी आणि संस्थानिकांना एकत्र येण्यासाठी, करमणुकीसाठी आणि खेळासाठी या क्लबची १८९८ साली स्थापना करण्यात आली. पूर्वी अधिकारी आणि संस्थानिक यांच्यापुरता हा क्लब मर्यादित होता. मात्र नंतर-नंतर उद्योगपती, वरिष्ठ खासगी आस्थापनांतील तसेच शासकीय अधिकारी, व्यावसायिक यांनाही याचे सभासदत्व देण्यात येऊ लागले.
गेल्या निवडणुकीत १५ पैकी १४ जण एकत्रितपणे निवडून आले. त्यावेळी केवळ मानसिंग जाधव हे एकटे अपक्ष उभे होते आणि ते निवडून आले व आनंद माने यांचा पराभव झाला. मात्र आता १९९२ पासून एकत्र असणाºया प्रोग्रेसिव्ह ग्रुपमध्येच उभी फूट पडली आहे. आठ संचालक एकीकडे आणि सातजण एकीकडे अशी विभागणी झाल्यामुळे ही निवडणूक रंगात आली आहे.
हे सर्वच उमेदवार आपापल्या क्षेत्रात कर्तबगारीने मोठे आहेत. कोल्हापूरच्या विविध क्षेत्रांत नावाजलेली अशी ही सर्व मंडळी आहेत. १७०० सभासदांना या प्रक्रियेत मतदार म्हणून भाग घेता येणार आहे. यातील १०० पेक्षा अधिक मतदार हे कोल्हापूरच्या बाहेर आहेत. यातील ७० ते ८० मतदार मतदानासाठी येण्याची शक्यता नाही. यांतील अनेक सभासद वयस्कर आहेत. ३५ हजार रुपये भरून २० वर्षांपूर्वी ते आजीव सभासद झाले आहेत. आता हीच फी चार लाखांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे १५०० पर्यंतच मतदान होण्याची शक्यता आहे.
गेली अनेक वर्षे एकत्र काम करणारे आता फुटले आहेत. त्यामुळे त्यांना एकमेकांची खडान्खडा माहिती आहे. निवडणुकीच्या निमित्ताने कुठले साहित्य कुणी कुठे नेले याची चर्चा सुरू आहे. या नकारात्मक प्रचाराचा परिणाम नेमका काय होणार, हे पाहणेही महत्त्वाचे आहे.
दोन्ही आघाड्यांमधील उमेदवारांचा सर्व सभासदांशी संपर्क असल्याने क्रॉस व्होंिटंगचा मोठा धोका आहे.
जरी पॅनेल टू पॅनेल मतदानासाठी आग्रह होत असला तरी त्यात कितपत यश येणार, हा औत्सुक्याचा विषय आहे. जाहीर प्रचार करून काही फायदा नसल्याने आपला उद्योग-व्यवसाय सोडून आता ही मंडळी प्रत्यक्षात गाठीभेटींमध्ये गुंतली आहेत. रविवारी (दि. ८) संध्याकाळी हा क्लब नेमका कुणाच्या ताब्यात जाणार, हे स्पष्ट होणार आहे.
प्रोगेसिव्ह ग्रुपचे उमेदवार
डॉ. दीपक आंबर्डेकर, शीतल भोसले (विद्यमान सहसचिव), नरेश चंदवाणी, अमर गांधी (विद्यमान सरचिटणीस), सतीश घाटगे, केदार हसबनीस, मानसिंग जाधव (विद्यमान संचालक), विक्रांत कदम (विद्यमान संचालक),समीर काळे, गिरीश कर्नावट, बी. व्ही. खोबरे (विद्यमान खजिनदार), नीलकांत पंडित (विद्यमान संचालक), रवी संघवी, मनोज वाधवानी, सचिन झंवर. या आघाडीमध्ये सहा विद्यमान संचालकांचा समावेश आहे.
ओरिजिनल प्रोगे्रसिव्ह ग्रुपचे उमेदवार
सुशील चंदवाणी, दिलीप चिटणीस (विद्यमान संचालक), अभय देशपांडे (विद्यमान संचालक), सचिन घाटगे, दिलीप जाधव, प्रशांत काळे (विद्यमान संचालक), अभिजित मगदूम (विद्यमान संचालक), आनंद माने, दिलीप मोहिते, श्रीकांत मोरे, रवींद्र पाटील (विद्यमान संचालक), गिरीश रायबागे, चंद्रकांत राठोड (विद्यमान संचालक), सत्यव्रत सबनीस (विद्यमान संचालक), रणजित शहा (विद्यमान संचालक) या आघाडीमध्ये आठ विद्यमान संचालकांचा समावेश आहे.
सचिवपद महत्त्वाचे
जिल्हाधिकारी हे या क्लबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख आणि कमांडंट प्रमुख हे पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळे या क्लबमध्ये सचिवपद हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
क्लबची वेळ- सकाळी ६ ते रात्री १०
क्लबची जागा - ३ एकर ३१ गुंठे
पार्किंग जागा- १ एकर
कार्यरत कर्मचारी - १३०
वार्षिक उलाढाल- १० कोटी रुपये
आजीव सभासद वर्गणी - ४ लाख आणि कर
वार्षिक वर्गणी- ३६०० अधिक कर
सभासद - १८१३, मतदानासाठी पात्र - १७००
देशभरातील ४३ क्लबशी परस्पर सेवा देण्याचा करार.
या आहेत सुविधा
या क्लबमध्ये अद्ययावत जिम, रेस्टॉरंट, फ्री वाय-फाय, जलतरण तलाव, बार, टेनिस, स्क्वॅश, बॅडमिंटन कोर्ट या सुविधा देण्यात येतात.