जेनेरिक औषधांच्या उपलब्धतेबाबत संभ्रम!
By admin | Published: April 25, 2017 05:38 PM2017-04-25T17:38:53+5:302017-04-25T17:38:53+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात अवघी १० दुकाने; डॉक्टर-औषधविक्रेत्यांची वेगवेगळी मते
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर दि. २५: रुग्णांचा खर्च कमी करणारी जेनेरिक औषधांच्या वापराबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण, डॉक्टर आणि औषधविक्रेते सकारात्मक आहेत. मात्र, यातील डॉक्टर आणि औषधविक्रेत्यांची मते वेगवेगळी आहेत. या औषधांचे गुणवत्ता नियंत्रण आणि त्यांची उपलब्धता वाढविणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. मात्र, बहुतांश दुकानांमध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध असल्याचे औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनेकडून सांगितले जात आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टरांकडून रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देतील असा कायदा करण्याचे संकेत दिले आहेत. यावर मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने जेनेरिक औषधे लिहून देणे बंधनकारक असल्याचे मार्गदर्शक तत्वांबाबतच्या जुन्या आदेशाचे पत्र पाठवून डॉक्टरांना आठवण करुन दिली आहे. यानुसार डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून देणे सुरू केले आहे.
रुग्णांचा औषधांचा खर्च कमी करण्यात संबंधित औषधे उपयुक्त ठरणारी आहेत. ही औषधे उपलब्धतेच्या दृष्टिने जिल्ह्यात जयसिंगपूर येथे पहिले जेनेरिक औषधांचे दुकान १ नोव्हेंबर २०१५ रोजी सुरू झाले. कोल्हापूर शहरात जेनेरिक औषधांची स्वतंत्र दुकाने तीन, तर जिल्"ात एकूण १० दुकाने सुरू आहेत.
या औषधांचे गुणवत्ता नियंत्रण होण्यासह त्यांची उपलब्धता वाढणे गरजेचे असल्याचे येथील डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. मात्र, जेनेरिक औषधे जिल्ह्यातील बहुतांश दुकानांमध्ये उपलब्ध असल्याचे औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्हा केमिस्ट असोसिएशनद्वारे सांगितले जात आहे.
जेनेरिक औषध म्हणजे काय?
जेनेरिक औषध म्हणजे त्या औषधाचे रासायनिक नाव, त्यामध्ये असलेल्या घटक पदार्थांचे नाव आणि यात कोणत्या ब्रँडचे औषध आहे. याचा उल्लेख नसतो. ही औषधे ब्रॅण्डेड औषधांपेक्षा सरासरी ४० ते ७० पर्यंत टक्के स्वस्त असतात. साध्या आजारपासून असाध्य आजारापर्यंत जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत.
जेनेरिक औषधांसाठी अॅप
‘हेल्थकार्ट प्लस’ आणि ‘पीजीएमएस प्रबोधन जेनेरिक मेडिसिन सर्च’ या अॅपमध्ये विविध औषधांच्या माहितीसह जेनेरिक औषधे म्हणजे काय?, त्यांच्या किंमती, औषधातील घटक, गुणधर्म आणि संबंधित औषधे कशी घ्यावीत याची माहिती आहे. या अॅपद्वारे औषधे घरी मागविण्याची सुविधा आहे.