‘गडहिंग्लज’मध्ये केंद्रीय प्रवेशाबाबत संभ्रमावस्था ! अकरावी प्रवेश : काही संस्थांचा विरोध,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:48 PM2018-06-07T23:48:50+5:302018-06-07T23:48:50+5:30
गतवर्षी गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षी या प्रक्रियेस काही संस्था चालकांचा विरोध आहे.
राम मगदूम ।
गडहिंग्लज : गतवर्षी गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षी या प्रक्रियेस काही संस्था चालकांचा विरोध आहे. दहावीचा निकाल आज शुक्रवारी जाहीर होत आहे. तरी प्रशासकीय हालचालीदेखील संथगतीनेच सुरू असल्यामुळे गडहिंग्लज विभागात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
परंतु, केंद्रीय प्रवेशाच्या मागणीवर विद्यार्थी व पालक ठाम आहेत. त्यामुळे याप्रश्नी शिक्षण विभाग कोणती भूमिका घेणार याकडे शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे.कोल्हापुराने राबविलेली केंद्रीय प्रवेश प्रक्रिया गडहिंग्लज शहरातदेखील सुरू करावी अशी मागणी होती. त्यासाठी काही पक्ष-संघटनांनीदेखील आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शासनाने त्यास मान्यता दिली. त्या पाठोपाठ त्यास स्थगिती आल्याने सामाजिक संघटना पुन्हा आक्रमक झाल्यामुळे मंजुरी मिळालेली केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली. त्यामुळे तालुकास्तरावर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा राज्यातील पहिला मान गडहिंग्लज तालुक्याला मिळाला. त्याचे राज्यभर कौतुक झाले.
मे मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीतही काही सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी सभापती प्रा. जयश्री तेली यांच्यासह सर्व सदस्यांनी संबंधित संस्थाचालक आणि प्राचार्यांची बैठक बोलावून शासनाकडून मंजुरी मिळालेली केंद्रीय प्रवेशाची कार्यवाही सुरू करण्याची सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी रमेश कोरवी यांनी दिली होती.
दरम्यान, मे महिन्यात संबंधित संस्थाचालक आणि प्राचार्यांची स्वतंत्र बैठक झाल्याचे समजते. मात्र, अद्याप ठोस निर्णय आणि प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, कागल व भुदरगडसह सीमाभागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गडहिंग्लजला येतात. मात्र, यावर्षी अकरावी प्रवेशासंदर्भात अद्याप कांहीच हालचाली नाहीत.
एकूण प्रवेश
क्षमता १,५४०
गडहिंग्लज शहरात अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व तुकड्यांत मिळून अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश क्षमता १,५४० इतकी आहे. गतवर्षी त्यापेक्षाही कमी अर्ज आल्यामुळे लांबलेली केंद्रीय प्रवेश प्रक्रियादेखील सुरळीतपार पडली होती.
केंद्रीय प्रवेशाची मागणी का?
अकरावी विज्ञानच्या प्रवेशासाठी काही महाविद्यालयात भरमसाट देणगी आणि अवाजवी शैक्षणिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याला आळा बसावा यासाठीच केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची मागणी पुढे आली. परंतु, त्याला खो घालण्याचा प्रयत्न कांहीच्याकडून सुरू आहे. त्यामुळेच प्रशासकीय हालचाली संथगतीने सुरू असल्याची चर्चा आहे.
गतवर्षी जनतेच्या रेट्यामुळेच अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मंजूर झाली. यापुढेही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारेच पारदर्शकपणे अकरावीचे प्रवेश दिले जावे, अशी जनतेची मागणी आहे. लोकभावनेचा आदर ठेवून शिक्षण विभागाने यंदाही ही प्रक्रिया तातडीने राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- बाळेश नाईक, अध्यक्ष- जनता दल गडहिंग्लज तालुका.