नगराध्यक्षपदाच्या निवड पद्धतीवरून संभ्रम
By admin | Published: April 19, 2015 10:09 PM2015-04-19T22:09:53+5:302015-04-20T00:13:08+5:30
निवडणुकीचे वेध : इचलकरंजीत इच्छुकांची चाचपणी सुरू
राजाराम पाटील - इचलकरंजी -नगरपालिका क्षेत्रात आगामी निवडणुकांचे वेध लागले असून, इचलकरंजीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी पडले आहे. नगरसेवकांची निवडणूक प्रत्येक प्रभागाला एक सदस्य या पद्धतीने होत असताना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची पद्धत निश्चित नसल्याने काहीशी संभ्रमावस्था आहे. मात्र, काही इच्छुकांनी चाचपणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक आणि नगराध्यक्षपदाची निवड हा विषय ऐरणीवर आला आहे.
गेली ५० वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्या तरी सन १९९८-९९ पासून नगरपालिकांतील सदस्य व नगराध्यक्षपदासाठी आरक्षणे होऊ लागली. इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद प्रथमच अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. राजीव आवळे यांची १७ डिसेंबर १९९८ ला नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या कारकिर्दीला अठरा महिने होत असतानाच बदललेल्या राजकीय स्थितीमुळे राजीव आवळे यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाला आणि ५ आॅक्टोबर २००० रोजी संजय आवळे नगराध्यक्ष झाले.
त्यानंतर नोव्हेंबर २००१ मध्ये झालेल्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इचलकरंजीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित झाले आणि नगराध्यक्षासाठी शहरातील सर्व मतदारांनी मतदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यावेळी कॉँग्रेसच्या किशोरी आवाडे या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या. पुढे नोव्हेंबर २००६ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत इचलकरंजीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण असे खुले झाले. त्यावेळी पुन्हा कॉँग्रेसचे बहुमत होऊन नगरसेवकांनी किशोरी आवाडे यांनाच नगराध्यक्षपदी निवडून दिले. पुढे बदललेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे आवाडे यांना नगराध्यक्षपदापासून दूर जावे लागले आणि २३ नोव्हेंबर २००९मध्ये मेघा चाळके या नगराध्यक्षा झाल्या.
नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इचलकरंजीचे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित झाले. या अडीच वर्षांत अनुक्रमे रत्नप्रभा भागवत, सुप्रिया गोंदकर, सुमन पोवार व बिस्मिल्ला मुजावर या चौघींना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. आता उर्वरित अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित आहे. त्याप्रमाणे सध्या शुभांगी बिरंजे या नगराध्यक्षा आहेत.
२०१६ मध्ये होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इचलकरंजीचे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांकरिता अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे.
एका प्रभागातून एक नगरसेवक याप्रमाणे प्रभाग रचना करण्याचे काम शासन पातळीवर सुरू आहे; पण आगामी निवडणुकीमध्ये नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांतून होणार अथवा लोकनियुक्त नगराध्यक्षा असणार, याबाबत शासनाने कोणतेही निश्चित धोरण जाहीर केले नसल्याने काहीशी संभ्रमावस्था आहे.
कारण नगराध्यक्ष हा लोकनियुक्त म्हणजे शहरातून निवडून द्यायचा झाल्यास संबंधित पदाचा उमेदवार ‘इलेक्शन मेरीट’ असणारा पाहिजे, अशी राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा आहे.