जीएसटीबाबत संभ्रम; बाजार गारठला
By admin | Published: July 3, 2017 01:00 AM2017-07-03T01:00:53+5:302017-07-03T01:00:53+5:30
जीएसटीबाबत संभ्रम; बाजार गारठला
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी कोल्हापूर शहरातील धान्य, इलेक्ट्रॉनिक्स, औषध, वाहने, सोने-चांदी, आदी क्षेत्रांतील बाजारपेठेत या कराची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत साशंकता असल्याचे चित्र दिसून आले. काही मोठ्या कंपन्या, बडे व्यापारी, व्यावसायिकांनी ५ जुलैपर्यंत व्यवहारच न करण्याचे धोरण स्वीकारले आहे; त्यामुळे एकूणच बाजारपेठेत शांतता आहे.
जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्या दिवशी एकत्रित करप्रणालीची कशी अंमलबजावणी करायची या चिंतेने अनेक व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांना ग्रासले होते. त्यामुळे अनेकांनी कर सल्लागारांचा सल्ला घेतला. शनिवारी (दि. १) तसेच रविवारी सुटी असूनही अनेक कर सल्लागाराच्या कार्यालयात गर्दी होती. धान्य बाजार जीएसटी लागू होण्यापूर्वीपासूनच मंदावल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून कडधान्य, ज्वारीचे दर उतरले आहेत. त्यात काही व्यापाऱ्यांनी जीएसटी लागणाऱ्या ब्रँडेड डाळी, तांदूळ, आटा, आदी धान्य न घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही बड्या व्यापाऱ्यांनी माल विकत घेणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना ‘जीएसटी’ क्रमांक काढण्याची गळ घातली आहे. त्यामुळे अनेक छोटे व्यापारी हे वीस लाखांच्या आतील उलाढाल करणारे आहेत. त्यामुळे जीएसटी क्रमांक काढणार नाही, अशा पवित्र्यात संबंधित छोटे व्यापारी आहेत. या परिस्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून धान्य बाजार थंडावला आहे. इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये ‘जीएसटी’ची अंमलबजावणी होण्यापूर्वी तुडुंब गर्दीचे चित्र होते. मात्र, शनिवारी सकाळपासून ही दुकाने ओस पडली आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर यापूर्वी व्हॅटसह अन्य करांच्या रूपाने साधारणत: १७ टक्के कर लावला जात होता. मात्र, या ‘जीएसटी’ची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून तो २८ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीशी पाठ फिरविली आहे.
औषध दुकानांमध्ये नियमितपणे व्यवहार सुरू आहेत. मात्र, यात कराची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे करायची याबाबत अजूनही साशंकता आहे. युनानी औषधे व आयुर्वेदिक औषधे असा फरक आहे. आयुर्वेदिक औषधांवर यापूर्वी सहा टक्के कर भरावा लागत होता. त्यात आता जीएसटीच्या रूपाने १२ टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषध दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे; तर युनानी औषध दुकानदारांमध्ये कर किती लावायचा याबद्दल शंका आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जुन्या दराप्रमाणे व साठा उपलब्ध असेपर्यंत काहींनी आहे त्याच दराने मालविक्री करणे पसंत केले आहे. तर काहींनी स्टॉक मोजणीसाठी दुकाने बंद ठेवली आहे.
सराफ बाजारही थंड आहे. बँकिंग सेवा दरातही शनिवारपासून वाढ झाली आहे. यात पूर्वी सेवाकर १५ टक्के होता. आता हाच ‘जीएसटी’मध्ये रूपांतरित झाल्याने १८ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे बँकिंगचा सेवाकर वाढला आहे. याबाबत राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्राहकांना ३० जूनपूर्वीच जीएसटी लागू करण्याचा निर्णय एसएमएसद्वारे कळविला होता. त्यात प्रथम १५ टक्के कर लावला जाणार, अशी सूचना होती. मात्र, त्यात वाढ करत १८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बँक ग्राहकांना आता १८ टक्के जीएसटी आपल्या खात्यावरील सेवेकरिता बँकेला द्यावे लागणार आहेत.
यापूर्वी आयुर्वेदिक औषधे, सौंदर्यप्रसाधने, आदी वस्तूंवर सहा टक्के कर भरावा लागत होता. आता जीएसटी लागू झाल्यानंतर १२ टक्के भरावा लागणार आहे. त्यामुळे हा बोजा ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे. साहजिकच दरही वाढणार आहेत. सरकारचे धोरण आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याचे आहे. तरीही यात वाढ केली, हे न समजणारे कोडे आहे.
- सागर साळोखे,
आयुर्वेद औषध विक्रेता
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेत जीएसटी लागू झाल्यानंतर दोन दिवसांपासून काहीशी शांतता पसरली आहे. नेमका किती कर लागणार आहे. याची माहिती मिळत नसल्याने संभ्रमावस्था आहे. - श्रीनिवास कुलकर्णी,
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे विक्रेते
‘जीएसटी’बाबत आवश्यक ती माहिती घेण्याची धान्य विक्रेत्यांची प्रक्रिया सुरू आहे. कर सल्लागार, चार्टर्ड अकौंटंट यांचा सल्ला घेत आहेत. त्यामुळे अनेकांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते थांबविले आहेत.
- संतोष शिरहट्टी, धान्य विक्रेते
जीएसटी लागू झाल्याने दुचाकी वाहनांच्या किमती सुमारे १५०० ते २००० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यात दोन दिवस शनिवार, रविवार अशी सुटी असल्याने संगणकीय अपडेट करण्यासाठी वाहन विक्रेत्यांनी दोन दिवस व्यवहार बंद ठेवले आहेत. - आण्णा मिरजे, वाहन विक्रेते
‘जीएसटी’मुळे सर्वसामान्यांमध्ये महागाई होईल, अशी भीती निर्माण झाली आहे. हा संभ्रम जीएसटी विभागाने जनजागृती करून दूर केला पाहिजे. काही दैनंदिन गरजेच्या वस्तू या करांमधून वगळाव्यात.
- अनुजा साळवी, गृहिणी