प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबत संभ्रमावस्था
By admin | Published: April 27, 2015 11:43 PM2015-04-27T23:43:30+5:302015-04-28T00:28:45+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांचा प्रश्न : वेगवेगळ्या पत्रांनी पेच
बाहुबली : शैक्षणिक वर्षाच्या शेवटी म्हणजे एप्रिल व मे महिन्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया केली जाते; परंतु गेली तीन-चार वर्षे या बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये प्रशासन स्तरावर गोंधळ होत आहे. याहीवर्षी तशीच अवस्था प्राथमिक शिक्षण विभागाची आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितींना सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार बदल्यांचे पत्र दिले. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी गैरसोयीतून गेलेल्या शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे पत्र पाठविले. त्यामुळे शिक्षकांसह पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आदी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ५ मे ते २५ मेपर्यंत केल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. सन २०११-१२ मध्ये तालुकाबाह्य बदल्या, अतिरिक्त शिक्षक व समायोजन प्रक्रियेमुळे बदल्यांबाबत आवश्यक ती सर्व प्रक्रिया वेळोवेळी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे अनेक शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच दोन अधिकाऱ्यांच्या पत्रांनी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
नियमानुसार गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या बदल्या सर्वप्रथम करणे अपेक्षित आहे. त्यानंतर सर्वसाधारण बदल्या होणे गरजेचे आहे. यामध्ये दहा टक्के प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या अंतर्भूत आहेत; परंतु प्रशासनाने सर्वप्रथम सर्वसाधारण बदल्या व नंतर गैरसोयीने झालेल्या बदल्यांबाबत पंचायत समितींना पत्रे पाठविली आहेत. त्यानुसार माहितीचे संकलनदेखील करून झाले आहे. आता पहिल्यांदा कोणत्या बदल्या होणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
राज्य शासनाच्या आॅगस्ट २०१४च्या आदेशानुसार सर्वप्रथम गैरसोयीतून झालेल्या बदल्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जातील. शिवाय सर्वसाधारण बदल्यांबाबतदेखील योग्य ती कार्यवाही नियमित वेळेत करून बदल्या केल्या जातील.
- स्मिता गौड,
प्राथमिक शिक्षणाधिकारी,
जिल्हा परिषद, कोल्हापूर.