प्रश्नपत्रिका वाटपाचा गोंधळ; तिघे कारवाईच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 10:28 PM2020-03-09T22:28:04+5:302020-03-09T22:28:18+5:30
इंग्रजी माध्यमातील एक विद्यार्थी हा १७ नंबर फॉर्म भरून परीक्षेसाठी बसला आहे तर उर्वरित विद्यार्थी हे नियमित आहेत.
कोल्हापूर: कडगाव ता भुदरगड येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याला मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका दिली गेली.संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली तरीही या विद्यार्थ्यांना समजले नाही.दोषी केंद्रसंचालक आणि दोन पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
आज सोमवारी इंग्रजीचा पेपर होता.कडगाव केंद्रावर ३४२ विद्यार्थी मराठी माध्यमातील तर ०१ विद्यार्थी इंग्रजी माध्यमात असे एकूण ३४३विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.खोली नंबर१३ मध्ये २५ विद्यार्थी मराठी माध्यमातील तर १४ नंबर खोलीत २४विद्यार्थी मराठी आणि एक इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
इंग्रजी माध्यमातील एक विद्यार्थी हा १७ नंबर फॉर्म भरून परीक्षेसाठी बसला आहे तर उर्वरित विद्यार्थी हे नियमित आहेत. १४ नंबर खोलीत इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका जाणे आवश्यक असतांना पर्यवेक्षकांच्या नजर चुकीने मराठी माध्यमातील तर १३ नंबर खोलीत इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या.सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवून दुपारी दोन वाजता घरी जात असताना विद्यार्थ्यांची चर्चा सुरू होती त्यातून या दोन खोलीतील विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की आपल्याला दिलेली प्रश्नपत्रिका चुकीची होती .मग यांनी पालकांकडे ही तक्रार केली आणि पालकांनी केंद्र गाठले.केंद्रसंचालक व्ही पी पाटील यांना धारेवर धरले.
पालकांनी याबाबतची तक्रार गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले यांच्याकडे केली.शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाने यांनी माहिती घेऊन अहवाल वरीष्टांकडे अहवाल सादर केला आहे. दोषींवर कारवाईची मागणी केलेली आहे. यानंतर पालकांनी विभागीय परीक्षा मंडळाकडे दाद मागितल्यावर त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे.
नेमके एका विद्यार्थ्यांच्या परिक्षेमुळे आज केंद्रसंचालकांच्यासह दोन शिक्षकांवर कारवाई होणार आहे.धन्य ते शिक्षक आणि धन्य ते विद्यार्थी