पोलीस खात्याच्या दाखल्यावरून उमेदवारांत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:31+5:302020-12-29T04:23:31+5:30
अनिल पाटील मुरगूड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांना ज्या त्या क्षेत्रातील पोलीस स्टेशनमधून गुन्हा नोंद नसल्याबाबत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रचंड ...
अनिल पाटील
मुरगूड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांना ज्या त्या क्षेत्रातील पोलीस स्टेशनमधून गुन्हा नोंद नसल्याबाबत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे. ऑनलाईन आवेदन पत्र भरताना स्वयंघोषणा पत्रामध्ये, आपल्यावर कोणताही गुन्हा नोंद नाही, असे घोषणापत्र उमेदवार देत आहेच. मग पुन्हा दोनशे रुपये खर्च करून पोलीस स्टेशनमधून वेगळ्या प्रमाणपत्राची गरज कशासाठी? असा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत. वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी याबाबत निवडणूक निर्णायक अधिकाऱ्याकडून योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे.
लोकप्रतिनिधी निवडत असताना तो गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचा नसावा, हा उदात्त हेतू ठेवून या प्रमाणपत्राची आवश्यकता ठेवली असेलही. पण मग लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुकीत हा निकष पाळला आहे का? असा प्रश्न ग्रामपंचायत इच्छुक उमेदवार उपस्थित करत आहेत. अगोदरच ऑनलाईन आवेदन पत्र भरताना ढीगभर अडचणी येत आहेत. एक फाॅर्म भरण्यासाठी सुमारे एक तास लागतो. शिवाय सर्व्हर डाऊन झाला तर हा वेळ वाढतो. रात्री-अपरात्री महा ई सेवा केंद्र व खासगी संस्थेत आवेदन पत्र भरताना उमेदवार दिसत आहेत. त्यात पुन्हा हे पोलिसी प्रमाणपत्र अडचणीचे ठरत आहे.
गुन्हा नोंद नसलेले प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोलीस खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करावी लागते. त्यानंतर मिळालेला युजर नेम आणि पासवर्ड टाकून पाच स्टेप्सवर विविध माहिती भरावी लागते. त्यानंतर सुमारे १२३ रुपये ऑनलाईन पैसे भरावे लागतात. हे आवेदन पत्र भरण्यासाठी सुमारे पन्नास ते शंभर रुपये, असे अधिकचे दोनशे ते अडीचशे रुपये खर्च येत आहे. तसेच उमेदवारी अर्जासाठी अंदाजे तीनशे रुपये द्यावे लागत आहेत. याशिवाय आवेदन पत्र दाखल करताना अनामत रक्कम ही वेगळीच द्यावी लागते.
ऑनलाईन माहिती भरल्यानंतर फोटोसहित माहिती भरलेला फाॅर्म व पैसे भरल्याची पावती घेऊन या उमेदवाराला जवळच्या पोलीस स्टेशनला जावे लागते. त्यानंतर त्याबाबत तपासणी करून त्या उमेदवाराला जिल्हा पोलीसप्रमुख यांच्यामार्फत, आपल्यावर कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. काही ठिकाणी याची आवश्यकता नाही असे सांगितले जाते. पण काही जण मात्र हे गरजेचे असल्याचे सांगत असल्याने, इच्छुकांच्यात गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे तात्काळ याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी होत आहेत.