Kolhapur: अंबाबाई मंदिरातील भुयारी दर्शनरांग, वाहनतळप्रश्नी अंधारच; विकासकामे संथ गतीने 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: August 30, 2023 02:23 PM2023-08-30T14:23:12+5:302023-08-30T14:24:33+5:30

कोल्हापूर : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अंबाबाई मंदिर परिसरात भुयारी दर्शनरांग व वाहनतळाची घोषणा केली असली तरी ते नेमके ...

Confusion among Kolhapur residents after the announcement of subway darshan queue and parking lot in Ambabai temple area | Kolhapur: अंबाबाई मंदिरातील भुयारी दर्शनरांग, वाहनतळप्रश्नी अंधारच; विकासकामे संथ गतीने 

Kolhapur: अंबाबाई मंदिरातील भुयारी दर्शनरांग, वाहनतळप्रश्नी अंधारच; विकासकामे संथ गतीने 

googlenewsNext

कोल्हापूर : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अंबाबाई मंदिर परिसरात भुयारी दर्शनरांग व वाहनतळाची घोषणा केली असली तरी ते नेमके कोठे, कसे साकारणार याबद्दल सगळ्याच संबंधित सर्वच यंत्रणांसमोर अंधार आहे. पालकमंत्री जादूची कांडी फिरवून कसा भुयारी मार्ग काढणार याबद्दल लोकांत उत्सुकता आहे.

सद्यस्थितीत मंदिर व भोवतालचा परिसर पाहिला तर भुयारी मार्गाने येथे करता येईल अशी शक्यता वाटत नाही. विद्यापीठ गेटसमोर दर्शन मंडप बांधण्याला भाविकांनी विरोध केला त्यावेळी याच जागेतून भुयारी दर्शन रांग करण्याचा विचार महापालिकेने केला होता. पण या किचकट गोष्टीत पडण्याऐवजी पार्किंगकडे निधी वळवला. आता नेमके कोणत्या ठिकाणाहून व कशा पद्धतीने भुयारी दर्शन रांग व वाहनतळ होणार आहे याची महापालिका किंवा देवस्थानच्या संबंधित कर्मचाऱ्यांनाही माहिती नाही. त्यामुळे सध्या तरी हा विषय फक्त पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांपुरताच मर्यादित आहे असे दिसते.

सरस्वती टॉकीज येथील महापालिकेच्या बहुमजली पार्किंगची इमारत अपूर्ण, तेथील भक्त निवासाला अजून मंजुरी नाही, देवस्थान समितीच्या वतीने कपिलतीर्थ मार्केटसमोरील जागेत सुरू असलेले भक्तनिवासाचे काम अपूर्ण, मणिकर्णिका कुंडाचे जतन संवर्धनाचे काम गेली दोन वर्षे जैसे थे, गरुड मंडपाने लोखंडी सळ्यांवर तग धरला आहे. अंबाबाई मंदिर व परिसराशी संबंधित सर्व विकासकामे कासव गतीने नव्हे गोगलगायीपेक्षाही संथगतीने सुरू आहेत.

पालकमंत्र्यांचे कौतुकच...

अंबाबाई भक्तांचा स्वच्छतागृहाचा प्रश्न सोडवण्यात गेली कित्येक वर्षे स्थानिक नेत्यांनी, पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले नाही. त्यासाठी अन्य जिल्ह्यातील नेते पालकमंत्री म्हणून यावे लागले ही खरे तर खेदाचीच बाब. शाहू छत्रपती यांच्या सहकार्यातून केसरकर यांनी भवानी मंडप परिसरातील सर्व शासकीय कार्यालये हलवून सुधारणा करत आहेत, यासाठी त्यांचे कौतुकच; पण शक्य असलेली आधीची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे.

भक्तनिवास मंजुरीच्या प्रतीक्षेत

सरस्वती टॉकीज येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुमजली पार्किंगचे काम गेली चार वर्षे सोयीच्या गतीने सुरू आहे. आता त्यावर तीन मजले चढवून भक्तनिवास उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला आहे. तीन महिने झाले तरी पालकमंत्र्यांची यावर बैठक होऊन मंजुरी मिळालेली नाही.

भक्तनिवासासाठी मंजुरी मिळून निधी येईपर्यंत खालच्या चार मजल्यांचेही काम पूर्ण करता येणार नाही, कारण पहिले चार मजल्यांचे काम संपवले आणि नंतर मंजुरी मिळाली तर खालच्या इमारती पुन्हा खराब होणार आहेत.

देवस्थानची इमारत जमेल तसे..

देवस्थान समितीच्या वतीने कपिलतीर्थ मार्केटसमोरील जागेत पार्किंग व भक्त निवासाचे काम गेल्या चार वर्षांपासून जमेल तसे सुरू आहे. आता जरा कामाने गती घेतलेली असून, दोन स्लॅब पूर्ण झाले आहेत. हाच वेग गृहीत धरला तर इमारत तयार होऊन भाविक राहायला जायला किमान दाेन तीन वर्षे सहज लागतील.
 

Web Title: Confusion among Kolhapur residents after the announcement of subway darshan queue and parking lot in Ambabai temple area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.