Kolhapur: कार्यक्रमात सत्कारमूर्तींच्याच कानशिलात लगावली, दोघी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 01:00 PM2023-07-01T13:00:41+5:302023-07-01T13:00:59+5:30
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचारीही गडबडून गेले
कळे : बाजारभोगाव ( ता. पन्हाळा ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरोप समारंभात दोघा महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. सेवाकाळात प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यास टाळाटाळ करणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी बदलीनिमित्त निरोप समारंभात वेळेत हजर राहिल्या. याचा दुसऱ्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांना राग आला आणि त्यांनी जाब विचारताच शाब्दिक चकमक झाली.
प्रकरण हातघाईवर गेल्यावर सत्कारमूर्तींच्याच कानशिलात लगावण्यात आली. इतर कर्मचाऱ्यांनी दोघींनाही बाजूला करत समजूत घातली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचारीही गडबडून गेले होते. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यापूर्वी वरिष्ठांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे अखेर माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मात्र, दिवसभर रुग्ण, कर्मचारी अन् नागरिकांमध्ये या राड्याची चर्चा रंगली होती.
बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची वर्ग १ व वर्ग २ अशी पदे आहेत. गेल्या चार वर्षांपासून या दोन्ही पदावर महिला अधिकारी कार्यरत होत्या. प्रमुख असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांकडे गगनबावड्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. दोन वर्षापासून त्या प्रमुख असूनही बाजारभोगावला त्यांनी सेवा देण्याकडे दुर्लक्ष केले होते. गरजेच्या वेळीही त्या आल्या नाहीत. त्यामुळे सर्व भार वर्ग २ च्या पदावर कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांवर पडला. आता या दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
चार-पाच दिवसांपूर्वी वर्ग २ पदावर कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा येथील कर्मचाऱ्यांनी निरोप समारंभ आयोजित केला होता, तर शुक्रवारी वर्ग १ पदावर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. ही बातमी कर्मचाऱ्यांमार्फत समजताच वर्ग दोन पदावर काम केलेल्या वैद्यकीय अधिकारी हजर झाल्या. त्यांनी शुभेच्छा देण्याऐवजी शाब्दिक चकमक सुरू केली. वाद वाढत गेल्याने त्यांनी सत्कारमूर्तींच्या कानशिलात लगावली.
याबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिला अधिकाऱ्यांची वरिष्ठांनी समजूत काढली. अखेर मारहाण केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा पडला. कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या प्रकाराबाबत दुजोरा दिला असला तरी संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्याने मात्र इन्कार केला आहे, तर दुसऱ्या महिला अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.