घरफाळा, पाणीपट्टी वाढ रद्दबाबत संभ्रम
By admin | Published: March 1, 2017 12:17 AM2017-03-01T00:17:48+5:302017-03-01T00:17:48+5:30
महापालिका सभा : प्रस्ताव नाकारण्याऐवजी प्रलंबित; भाजी मार्केट, सांस्कृतिक हॉल, मैदानाच्या भाड्यात वाढ
कोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीत घरफाळ्यात तसेच पाणीपट्टीत वाढ केली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही महापौर हसिना फरास यांनी दिल्यानंतरही हे प्रस्ताव मंगळवारच्या महानगरपालिका सभेत नाकारण्याऐवजी प्रलंबित ठेवण्याचा निर्णय झाल्याने नगरसेवकांत संभ्रम निर्माण झाला. या प्रश्नावर काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख व भाजप नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली; परंतु त्यात लगेचच हस्तक्षेप करत चर्चा थांबविण्यात आली.
महापौर हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंगळवारच्या महासभेत परवाना, भाजी मार्केट शुल्क, सांस्कृतिक हॉल, मैदाने, जिम्नॅशियम हॉल, बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव, चित्रपटगृहे यांना आकारण्यात येणारे शुल्क सरासरी पाच टक्क्यांपर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली. त्यासंबंधी एक उपसूचनाही देण्यात आली. त्यामुळे ही वाढ नेमकी किती होणार हे अस्पष्टच आहे. केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाचे भाडे सध्या आहे तेवढेच ठेवण्याचा निर्णय यावेळी झाला.
घरफाळा व पाणीपट्टीत वाढ सुचविणारे प्रशासनाचे प्रस्ताव अमान्य केले जातील, अशी अपेक्षा होती पण ते अमान्य न करता पुढील मिटिंग करण्यात आले. जेव्हा हा विषय सभागृहात पुकारण्यात आला, तेव्हा कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी तो पुढील मिटिंगमध्ये करा, असे सांगितले. त्याला भाजपच्या अजित ठाणेकर यांनी हरकत घेतली. जर करवाढ करायचीच नाही तर मग पुढील मिटिंग का करता? फेटाळत का नाही? अशी विचारणा केली. त्यावर देशमुख यांनी कोणतीही करवाढ होणार नाही, आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत पुढील मिटिंगला त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले. त्यावरून देशमुख व ठाणेकर यांच्यात किरकोळ शाब्दिक चकमकही उडाली; पण भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी हस्तक्षेप करत ठाणेकर यांना शांत केले.
विकासकामे सुरू करावीत
ईपीएफ प्रश्नावरून शहरातील विकासकामे करण्यासाठी स्थानिक ठेकेदारांनी निविदा भरलेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून विकासकामे थांबली आहेत. त्यावरूनसुद्धा नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. अनुराधा खेडकर यांनी ठेकेदारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. जयंत पाटील यांनी तर प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने कामे थांबली असल्याचा आरोप केला. मार्च महिना सुरू होत असून निधी बुडण्याची शक्यता आहे, त्याला जबाबदार कोण? अशी विचारणाही त्यांनी केली. शेखर कुसाळे, सत्यजित कदम, प्रवीण लिमकर, रूपाराणी निकम, आदींनी टीकेची झोड उठविली. शारंगधर देशमुख यांनी तर अधिकाऱ्यांवर मोठ्या ठेकेदारांकडून सुपारी घेतली असल्याचा आरोप केला. छोट्या ठेकेदारांना कामेच मिळू नयेत, असा अधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. नगरसेवकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन वीसपेक्षा अधिक कर्मचारी नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन छोट्या ठेकेदारांना कामे देण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी सांगितल्यावर यावर पडदा पडला.
आयुक्तांची अनुपस्थिती
आयुक्त महासभेला उपस्थित नव्हते. त्यांच्या उपस्थितीतच घरफाळ्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार होता; पण ते आले नसल्याने त्यांच्यावर पळपुटेपणाचा आरोप अजित ठाणेकर व शारंगधर देशमुख यांनी केला. सभाध्यक्षा फरास यांनीही त्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली. दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आयुक्तांची वेळ घेऊन ‘खास सभा’ बोलवावी, अशी मागणी विजय सूर्यवंशी यांनी केली. तथापि, खास सभा न घेता हे प्रस्ताव प्रलंबित ठेवून पुढील सभेत त्यावर चर्चा करण्याचे ठरले.
घरफाळ्याची पद्धत बदलणार?
राज्यात केवळ कोल्हापूर महानगरपालिका रेडिरेकनरवर आधारित घरफाळ्याची आकारणी करत असून ही पद्धत स्वीकारल्यामुळे घरफाळ्याचे दर प्रचंड वाढलेले आहेत. त्याला सर्वच नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे पूर्ववत भाडेमूल्यावर आधारित घरफाळा आकारणी करण्याचा विचार नगरसेवकांचा आहे. यासंबंधाने आयुक्तांशी चर्चा झाल्याचे वृत्त असून तसा प्रस्ताव तयार केला जात आहे.
पाणीपुरवठ्यावरून प्रशासनास झापले
कोल्हापूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून विशेषत: ई वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या कारणावरून मंगळवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनास झापले. जर येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही, तर नागरिकांसोबत ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. सभाध्यक्षा महापौर हसिना फरास यांनीही नाराजी व्यक्त करीत पाणीपुरवठ्याबाबत तातडीने नियोजन करण्याचे आदेश दिले.
प्रश्नोत्तरांवेळी उमा इंगळे यांनी ई वॉर्डातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यावरून चर्चेला तोंड फुटले. इंगळे यांच्यासह आशिष ढवळे, मुरलीधर जाधव, प्रवीण लिमकर, वनिता देठे, जयंत पाटील, आदींनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यावेळी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी थातुरमातुर उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा (हॅलो ३ वर)