चंदगड निवडणूक विभागाचा सावळागोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:05+5:302021-01-02T04:21:05+5:30
चंदगड : चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून कर्मचारी नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश कर्मचाऱ्यांना दोन-दोन ...
चंदगड : चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून कर्मचारी नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश कर्मचाऱ्यांना दोन-दोन पथकामध्ये नियुक्तीचे लेखी आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी १४४ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात चार कर्मचारी नियुक्त केले आहेत. या सर्वांचे प्रशिक्षण ६ व ११ जानेवारीला चंदगडच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे. यासंदर्भातील नियुक्ती आदेश कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले आहेत. पण एकाच कर्मचाऱ्याची दोन पथकांमध्ये नियुक्ती करून दोन वेगवेगळे आदेश देण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. नेमका कोणता आदेश स्वीकारावा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या दोन्ही आदेश स्वीकारले असले तरी प्रशिक्षणास उपस्थित राहताना पुन्हा गोंधळ निर्माण होणार आहे.
यापूर्वीच्या अनुभवानुसार एक आदेश स्वीकारून प्रशिक्षण केल्यास दुसऱ्या आदेशात अनुपस्थिती लागते. लगेच निवडणूक विभाग कारणे दाखवा नोटीस बजावतो. त्यामुळे निवडणूक विभागाने असे दोन दोन दिलेले नियुक्ती आदेशांचे त्वरित स्पष्टीकरण करून हा गोंधळ थांबवावा, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.