इचलकरंजीतील कोरोना लसीकरण केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:14+5:302021-04-22T04:25:14+5:30
कोरोना महामारीला थोपविण्यासाठी सर्वत्र लसीकरण सुरू आहे. सुरुवातीस नागरिकांचा लसीकरणास अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र, काही दिवसांपासून गर्दी वाढत ...
कोरोना महामारीला थोपविण्यासाठी सर्वत्र लसीकरण सुरू आहे. सुरुवातीस नागरिकांचा लसीकरणास अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र, काही दिवसांपासून गर्दी वाढत आहे. दोन दिवसांपासून लसीचा तुडवडा जाणवत असल्याने लसीकरणात खंड पडत आहे. बुधवारी पुन्हा लसीकरणास सुरुवात झाल्यामुळे केंद्रावर गर्दी झाली होती. यावेळी प्रत्येकजण लस घेण्यासाठी गडबड करीत होते. तसेच काही नागरिक थेट लसीकरण केंद्रात येऊन लस घेत होते. त्यामुळे काहीजण वशिलेबाजी करून त्यांना लस दिली जात आहे. मात्र, तासन्तास रांगेत उभे राहूनही आम्हाला लस मिळत नाही, असा आरोप करीत नागरिकांनी गोंधळ केला. यातून वाद निर्माण होऊन गोंधळ उडाला. याची माहिती मिळताच गावभाग पोलीस तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी हस्तक्षेप करीत नागरिकांना शांत केल्याने अनुचित प्रकार टळला. पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवत नागरिकांची रांग करून बंदोबस्तात लसीकरणास सुरुवात केली.
चौकट
शहरातील अनेक केंद्रांवर सारखीच परिस्थिती
शहर व परिसरात नऊ केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू आहे. सध्या नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे सर्वच केंद्रांवर गोंधळ उडत आहे. तांबे माळ परिसरातील केंद्रांवरही गर्दीमुळे गोंधळ निर्माण झाला होता. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. नगरपालिका प्रशासनाने योग्य नियोजन करून लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो ओळी
२१०४२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीतील लालनगर परिसरात कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांत गोंधळ झाला होता.