Kolhapur News: कोणते इंजेक्शन देणार आहे ते आधी दाखवा, गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकपुत्राचा सीपीआरमध्ये गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 01:12 PM2023-01-09T13:12:55+5:302023-01-09T13:13:29+5:30
सीपीआरमधील डॉक्टर आणि कर्मचारी घाबरले
कोल्हापूर : येथील ताराबाई पार्कात राहायला असलेल्या दूध संघाच्या माजी संचालकाच्या मुलाने रविवारी (दि. ८) पहाटे सीपीआरच्या अपघात विभागात गोंधळ घातला. कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी आलेल्या या संचालकपुत्राने औषधोपचारावरून डॉक्टरांशी वाद घातला. तासाभराच्या गोंधळानंतर श्वानदंशाची नोंद न करताच ते सीपीआरमधून निघून गेले.
रविवारी पहाटे घडलेल्या या प्रकाराची दिवसभर शहरात चर्चा होती. कुत्रा चावल्यामुळे हे संचालकपुत्र पहाटे पाचच्या सुमारास एका मित्रासोबत उपचारासाठी आले होते. औषधोपचार करण्यापूर्वीच त्यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. कोणते इंजेक्शन देणार आहे ते आधी दाखवा आणि त्यानंतरच उपचार करा, असा आग्रह डॉक्टरांकडे धरला.
प्रथमोपचारानंतरही त्यांचा आणि मित्राचा गोंधळ सुरूच होता. त्यामुळे सीपीआरमधील डॉक्टर आणि कर्मचारी घाबरले. काही वेळाने त्यांची पत्नी सीपीआरमध्ये पोहोचली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मात्र सीपीआरमधील पोलिस ठाण्यात श्वानदंशाची वर्दी न देताच ते खासगी रुग्णालयात गेले.