शिक्षण संस्थांच्या निवड यादीत गुणवत्ताधारकांना डावलले!, पवित्र पोर्टलमार्फत भरतीत सावळागोंधळ
By संदीप आडनाईक | Published: July 22, 2023 01:05 PM2023-07-22T13:05:18+5:302023-07-22T13:05:40+5:30
कमी गुण असलेल्यांची निवड, शिक्षकांचा आरोप
संदीप आडनाईक
कोल्हापूर : पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीतील मुलाखतीच्या निवड यादीत सावळागोंधळ असल्याचे उघडकीस आले आहे. या भरतीअंतर्गत राज्यातील १९६ शिक्षण संस्थांच्या निवड यादीत गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय झाला असून त्यांना या प्रक्रियेतून डावलल्याचा आरोप संबंधित शिक्षकांनी केला आहे.
पवित्र पोर्टलमार्फत राज्यात २०१७ पासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. विविध कारणांमुळे ही शिक्षक भरती प्रक्रिया २०२० पर्यंत रखडली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा ही भरती प्रक्रिया अपूर्ण राहिली. परंतु ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आणि त्यानंतर राज्य शासनाने १५ जुलै २०२१ रोजी शासन निर्णयाद्वारे मराठा आरक्षणाची (एसईबीसी) पदे खुल्या आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गात समाविष्ट करून यादी जाहीर करण्याचे आदेश दिले. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे याची अंमलबजावणी दीर्घकाळ झालीच नाही.
संबंधित उमेदवारांनी वेळोवेळी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे ही प्रक्रिया संथ गतीने सुरू झाली. नोव्हेंबर २०२२ च्या दरम्यान १९६ शिक्षण संस्थांमधील साधारण ७६९ पदांसाठी पसंतीक्रम घेण्यात आले. परंतु डाटा मिसमॅच झाल्यामुळे हे सर्व पसंतीक्रम रद्द करून, एप्रिल २०२३ मध्ये पुन्हा नव्याने पसंतीक्रम घेण्यात आले. परंतु त्यातही जवळपास ६००० उमेदवारांना चुकीचे पसंतीक्रम आल्याने ३० मे ते ५ जून २०२३ या काळात त्या उमेदवारांचे नव्याने पसंतीक्रम घेण्यात आले.
त्यानंतर १५ जुलै २०२३ रोजी १९६ शिक्षण संस्थांची मुलाखतीची निवड यादी जाहीर झाली परंतु या यादीमध्येही गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांना डावलून कमी गुण असलेल्या उमेदवारांची निवड झाल्याचे स्पष्ट झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे निवड यादी जाहीर होण्यासाठी साडेपाच वर्षे लागली. त्यातही निवड यादीत गुणवत्ताधारक उमेदवारांना डावलून कमी गुण असलेल्या उमेदवारांची निवड झाल्याने संबंधित उमेदवारांकडून संताप व्यक्त होत आहे.
शासनाने तत्काळ जाहीर झालेली निवड यादी रद्द करून, त्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि पुन्हा नव्याने निवड यादी जाहीर करावी. यासाठी पुन्हा पसंतीक्रम घेण्याची आवश्यकता नाही. -महेश पाटील, मु.पो. कुटवाड, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर.