Kolhapur News: शिवाजी विद्यापीठातील सिनेट बैठकीत गोंधळ, अभाविपचे कार्यकर्ते सभागृहात घुसले
By संदीप आडनाईक | Updated: March 10, 2023 13:51 IST2023-03-10T13:40:11+5:302023-03-10T13:51:29+5:30
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी हस्तक्षेप करून चर्चा करण्याचे निमंत्रण दिले

Kolhapur News: शिवाजी विद्यापीठातील सिनेट बैठकीत गोंधळ, अभाविपचे कार्यकर्ते सभागृहात घुसले
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सिनेट बैठकीत सभा सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते घुसले आणि घोषणाबाजी करत महाविद्यालयीन निवडणुका झाल्याच पाहिजेत या मागणीसाठी सभागृहात बैठक मारून गोंधळ घातला. यासंदर्भात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी हस्तक्षेप करून या सभागृहात याबद्दल चर्चा करता येणार नाही असे सांगून १६ मार्च रोजी चर्चा करण्याचे निमंत्रण दिले.
शिवाजी विद्यापीठाची अधिसभा बैठक सुरू झाल्यानंतर साडे बारा वाजण्याच्या सुमारास राजश्री शाहू सभागृहात घुसून अभविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी "भारत माता की जय", "विद्यार्थ्यांना न्याय द्या", "आत्महत्याग्रस्त प्राध्यापकांना न्याय द्या", "विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका चालू होणार कधी?" अशा घोषणा देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सुमारे पंधरा-सोळा कार्यकर्ते घुसले. महाविद्यालयीन निवडणुका घ्याव्यात आणि इतर मागण्यांसाठी फलक घेऊन कार्यकर्ते कुलगुरूंच्या समोर ठिय्या मारून बसले. सुमारे २० मिनिटे हा गोंधळ सभागृहात सुरू होता. सुरक्षारक्षकांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
प्र कुलगुरू आणि कुलसचिव यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी आणि अधिसभा सदस्य ऍड. स्वागत परुळेकर यांनी समजावून सांगितले. कुलगुरू शिर्के यांनी अधिसभा बैठकीत बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल आणि पूर्वपरवानगी न घेतल्याबद्दल कानउघाडणी केली. कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेऊन कुलगुरूंनी १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता चर्चेचे निमंत्रण दिले. यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा देत सभागृह सोडले.
या आंदोलनात प्रदेश सहमंत्री अमोघ कुलकर्णी, दिग्विजय गरड, दिनेश हुमनाबदे, रोहन कडोले, सूरज मालगावे, प्रविण डिगेकर, जय पाटील, पराग कुलकर्णी, गणेश डूबल सहभागी झाले होते.
अभाविपच्या मागण्या
- आत्महत्याग्रस्त प्राध्यापक यांच्या कुटुंबास योग्य ती आर्थिक मदत विद्यापीठाने करावी.
- विद्यापीठातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना कायम करून घेण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा.
- तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी.
- वारंवार होणाऱ्या पेपरफुटीस जबाबदार अधिकर्यांवर कठोर कारवाई करावी
- नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका या येत्या शैक्षणिक वर्षा २०२३-२४ साठी घेणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर करावे.
- विद्यापीठातील सर्व प्रभारी पद्धतीने भरलेली पदे लवकरात लवकर कायमस्वरूपात भरावी.