पाेटनियम दुरुस्तीवरून कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सभेत गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 11:09 AM2022-09-17T11:09:56+5:302022-09-17T11:10:21+5:30
पोटनियम दुरुस्तीवरून संचालक मंडळात चर्चा झाली होती. तिथे काही संचालकांनी विरोधही केला होता. मात्र, सभेत तो मंजूर करण्यात आला.
कोल्हापूर : साखर कारखाने, सूतगिरण्या व प्रक्रिया संस्था गटाच्या पोटनियम दुरुस्तीला खासदार संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभेत गोंधळ उडाला. गोंधळातच बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला असून, आता साखर कारखाने व सूतगिरण्यांसाठी दोन, तर इतर प्रक्रिया संस्थांसाठी संचालक मंडळात एक जागा राहणार आहे.
जिल्हा बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी शाहू सांस्कृतिक मंदिर, शाहू मार्केट यार्ड येथे झाली. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ होते. विषय क्रमांक ९ पोटनियम दुरुस्ती विषयावर चर्चा होताना माजी आमदार के.पी. पाटील यांनी साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा कृषी औद्योगिक, तालुका खरेदी- विक्री संघासाठी एकऐवजी दोन जागा कराव्यात व शेतीमाल प्रक्रिया संस्था, फळे व इतर प्रक्रिया संस्थांचा एक गट करून त्यात एक जागा करावी, अशी दुरुस्ती सुचवली. त्याला खासदार मंडलिक समर्थक राजेखान जमादार, जयसिंग भोसले, संतोष धुमाळ आदींनी आक्षेप घेत विरोध केला. त्यावर सत्तारूढ गटाच्या समर्थकांनी मंजूर मंजूर सुरू केल्याने गोंधळ उडाला. गोंधळातच राष्ट्रगीत सुरू झाले आणि सभा संपली.
संचालक मंडळातही जोरदार चर्चा
पोटनियम दुरुस्तीवरून संचालक मंडळात चर्चा झाली होती. तिथे काही संचालकांनी विरोधही केला होता. मात्र, सभेत तो मंजूर करण्यात आला.
काय आहे वाद...
साखर कारखाने, सूतगिरण्या व पणन प्रक्रिया संस्थांचा एकच गट होता. या गटात दोन जागा होत्या, बँकेच्या गेल्या निवडणुकीत येथून खासदार संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी तयारी केली होती. मात्र, आसुर्लेकर यांच्या उमेदवारीला आमदार विनय काेरे यांनी विरोध केल्याने मंडलिक यांनी सत्तारूढ गटाशी फारकत घेत पॅनल उभे केले होते. सत्तारूढ गटाने विरोध करूनही आसुर्लेकर निवडून आले. त्यामुळे पोटनियम दुरुस्तीत हा गटच फोडून आसुर्लेकर यांच्यासमोरील अडचणी वाढवल्या आहेत.
५७२ मतांसाठी एक, तर ७५ मतासाठी दोन जागा
गेल्या निवडणुकीत कृषी पणन प्रक्रिया गट एक होता, यामध्ये ६४७ मते होती. आता तो फोडताना साखर कारखाने, सूतगिरण्या जिल्हा व तालुका खरेदी- विक्री संघाचा गट केला, यामध्ये केवळ ७५ मतासाठी दोन जागा, तर उर्वरित ५७२ मतांचा एक गट करत त्याला एक जागा दिल्याचा आरोप विरोधी गटाचा आहे.