‘कोजिमाशि’ सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:28 AM2018-08-20T00:28:58+5:302018-08-20T00:29:01+5:30

Confusion in 'Kojimaash' meeting | ‘कोजिमाशि’ सभेत गोंधळ

‘कोजिमाशि’ सभेत गोंधळ

googlenewsNext

कोल्हापूर : नोकरभरतीचा प्रश्न विचारण्यावरून ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या सभेत काही काळ गोंधळ उडाला. सभेपूर्वी हृदयविकाराचा त्रास झाल्याने कांडगाव हायस्कूलचे सचिन दाभाडे यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने सभेस येण्यास उशीर झाल्याचे दादासाहेब लाड यांनी सभागृहात सांगितले. त्यावर संजय लोटके (तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, इचलकरंजी) यांनी हरकत घेऊन मदत करायची तर जाहीर वाच्यता का करता? अशी विचारणा केल्याने सारे सभागृहच लोटके यांच्या अंगावर धावून गेले. यामध्ये त्यांना जोरदार धक्काबुक्की करण्यात आली. कोतोली, राधानगरी येथे शाखा सुरू करण्याबरोबरच सभासदांना बिनव्याजी लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेची ४८ वी वार्षिक सभा रविवारी शाहू सांस्कृतिक मंदिर, मार्केट यार्ड येथे झाली. अध्यक्षस्थानी सभापती प्रा. हिंदूराव पाटील होते. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील; पण शांततेत प्रश्न विचारण्याचे आवाहन शिक्षक नेते दादासाहेब लाड व सभापती पाटील यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी अहवाल वाचन केले.
विनोद उत्तेकर (महाराष्टÑ हायस्कूल) यांनी सर्व शाखा संगणकीकृत असताना भरती का केली? शिक्षकांना तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून काढावे लागते, मग या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांत कायम कसे केले? भरती प्रक्रियेला स्थगिती द्या. अशी मागणी केली. १९९७ पासून भरती केली नसल्याने १७ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आणि दोन नवीन शाखा झाल्याने गरजेपुरती व परीक्षा प्रक्रिया राबवून भरती केली. त्यांचा प्रोबेशनल कालावधी संपल्यानंतर नियमानुसारच त्यांना कायम केल्याचे दादासाहेब लाड यांनी सांगितले. तरीही उत्तेकर व्यासपीठावरच थांबल्याने इतरांना प्रश्न विचारू द्या, असे लाड यांनी सांगितल्यानंतर विरोधकांनी गोंधळ सुरू केला. सत्तारूढ व विरोधक एकमेकांच्या दिशेने आल्याने गोंधळात भर पडली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सभा सुरू झाली. शेअर्स मर्यादा कमी असल्याने सभासदांचा तोटा होत असल्याचे एस. एम. नाळे यांनी निदर्शनास आणून दिले. तुम्ही ज्या पतपेढीत काम करता तिथे दोन अंकी तरी लाभांश देता का? अशी लाड यांनी विचारणा केली.
दादासाहेब लाड यांनी सचिन दाभाडे यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या सत्कर्माच्या जाहीर वाच्यतेवर संजय लोटके यांनी आक्षेप घेतला आणि सारे सभागृहच त्यांच्या अंगावर गेल्याने धक्काबुक्की झाली. पोलिसांनी लोटकेंना बाहेर काढल्यानंतर सभागृह शांत झाले. यावेळी अर्ध्या रात्री जरी कोण्या सभासदाला अडचण आली तरी धावून जाण्याचे आमच्यावर संस्कार आहेत. सभागृहात येण्यास उशीर झाल्याचे कारण सांगितले त्याचे कोणी भांडवल करत असेल तर दुर्दैवी असल्याचे लाड यांनी सांगितले. कर्जमुक्ती योजनेतील सभासदांच्या हिश्श्याची रक्कम परत द्यावी, अशी मागणी संजय पाटील यांनी केली. हलकर्णी येथून कोवाड येथे शाखा स्थलांतर केल्याने चार लाखांच्या ठेवी वाढल्याबद्दल के. एस. खाडे, एस. जी. देसाई यांचे कौतुक केले. आनंदराव काटकर यांनी आभार मानले. चर्चेत रंगराव तोरस्कर, आनंदराव इंगवले, सयाजी देसाई, अशोक मानकर, आदींनी भाग घेतला.
संचालकांच्या अभिनंदनाचा ठराव
वीस टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षकांना सभासद करून त्यांना कर्जपुरवठा केल्याबद्दल, सर्व घटकांना न्याय देत पारदर्शक नोकरभरती केली, यामध्ये रवींद्र पाटील या ९५ टक्के अपंग मुलग्याला नोकरी दिल्याबद्दल संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव शंकरराव जगदाळे, एस. आर. पाटील यांनी मांडला.
दिवाळी सुट्टीत ‘हवाई सफर’
प्रासंगिक कर्जातून सहलीसाठी पैसे घेऊ शकता. तरीही सभासदांची इच्छा असल्यास दिवाळी सुटीत कोल्हापूर-दिल्ली हवाई सफर केली जाईल. त्यासाठी संस्था पुढाकार घेईल; पण ती ऐच्छिक असेल, असे लाड यांनी सांगितले.

Web Title: Confusion in 'Kojimaash' meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.