घटस्फोटावरून विवाहितेचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:01+5:302021-03-04T04:44:01+5:30
कोल्हापूर : घटस्फोट देण्यासाठी तसेच पोलिसांतील तक्रार मागे घेण्यासाठी नातेवाईक दबाव टाकत असल्याचा आरोप करीत एका विवाहितेने कसबा बावडा ...
कोल्हापूर : घटस्फोट देण्यासाठी तसेच पोलिसांतील तक्रार मागे घेण्यासाठी नातेवाईक दबाव टाकत असल्याचा आरोप करीत एका विवाहितेने कसबा बावडा रोडवर न्यायसंकुलाच्या परिसरात गोंधळ माजविला. नातेवाइकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गोंधळाचे वातावरण झाल्याने शाहूपुरी पोलीसही तातडीने तेथे पोहोचले व त्यांनी विवाहितेस पोलीस ठाण्यात नेले. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, एका परगावच्या तरुणीचा दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरात तरुणाशी विवाह झाला होता; पण काही दिवसांपासून विवाहिता ही माहेरीच राहत होती. तिने पतीसह घरच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी नातेवाइकांनी तडजोडीचे प्रयत्न सुरू होते. अखेर आर्थिक नुकसान भरपाई देण्यावर एकमत झाले. पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी नातेवाइकांनी तिच्याशी चर्चा केली. मंगळवारी दुपारी नातेवाईक तिला घेऊन कसबा बावडा रोडवरील न्यायसंकुलात आले. तेथेही तिची समजूत काढताना, तिला तक्रार मागे घे व घटस्फोटही दे असा दबाव टाकल्याने तिने गोंधळ माजविला. संबंधित विवाहितेने, मला दोन वर्षे त्रास झाला आहे, त्याची किंमत पैशात करू नका, मी तक्रार मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. गोंधळ निर्माण झाल्याने नातेवाइकांनी तेथून काढता पाय घेतला. तातडीने शाहूपुरी पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी विवाहितेस तक्रार नोंदविण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेले.