आक्षेपार्ह स्टेटस अन् कोल्हापूर तणाव प्रकरणी ६ जणांना अटक; दीपक केसरकरांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 01:11 PM2023-06-07T13:11:00+5:302023-06-07T13:24:19+5:30
या प्रकरणी कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली.
कोल्हापूर- स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून कोल्हापूर शहरात मंगळवारी दोन गटात झालेल्या वादानंतर रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. आता स्टेटस ठेवल्या प्रकरणी झालेल्या गोंधळा प्रकरणी ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
आक्षेपार्ह स्टेटसवरुन कोल्हापुरात तणाव, जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू
पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आता कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मी या संदर्भात बैठक घेणार आहे. काल स्टेटसमध्ये आक्षेपार्ह फोटो ठेवल्या प्रकरणी कारवाई करत त्यांना अटक केली. यात पोलिसात तक्रार द्यायला आलेल्या गर्दीने बाहेर जाऊन गोंधळ केला, या प्रकरणात काही जणांवर केसेस दाखल झाल्या. त्यामुळे आज या केसेस मागे घ्याव्या ही मागणी करत काहीजण आले. यामुळे आज हा गोंधळ झाला. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी मोठा गोंधळ निर्माण झाला असून आतापर्यंत ६ जणांना अटक झाली आहे. या दगडफेक करणाऱ्यांनाही अटक झाली आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
"प्रत्येकाने संयम बाळगला पाहिजे, दोषी असणाऱ्यांवर कारवाई होईल. कोल्हापूर या प्रकारामुळे बंद राहिले आहे, असे प्रकार चांगले नाहीत, असंही दीपक केसरकर म्हणाले.
गंजी गल्ली परिसरात दगडफेक
हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.
शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद
सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ४०० ते ५०० तरुण गंजी गल्लीत घुसल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. काही घरांवर दगडफेड झाल्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे.