इचलकरंजी नगरपालिकेत कचरा व्यवस्थापनावरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:42+5:302021-06-11T04:16:42+5:30
इचलकरंजी शहरात प्रत्येक प्रभागात आदर्श फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपनीद्वारे घंटागाडीच्या माध्यमातून कचरा उठाव केला जातो. या कामाबद्दल काही ...
इचलकरंजी शहरात प्रत्येक प्रभागात आदर्श फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपनीद्वारे घंटागाडीच्या माध्यमातून कचरा उठाव केला जातो. या कामाबद्दल काही नगरसेवक व पदाधिका-यांच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाचे अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी व पर्यवेक्षक यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पदाधिकारी व नगरसेवकांनी कचरा उठावाबद्दल तक्रारी मांडल्या.
बैठकीत मुख्याधिकारी ठेंगल यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना करारानुसार काम करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाकडील यंत्रणेचा पुरेपूर वापर करावा. कचरा डेपोवर वाहतुकीची सुविधा करण्यात यावी. तसेच जे नागरिक घंटागाडीमध्ये कचरा न टाकता रस्त्यावर अथवा इतरत्र टाकतील त्यांच्यावर कारवाई करणेचे आदेश दिले. उपनगराध्यक्ष पोवार यांनी सध्या शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची बाब असल्याने शहरातील कचरा उठावाचे काम सक्षमपणे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, मदन झोरे, मनोज हिंगमिरे, किसन शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी व मुकादम उपस्थित होते.