दुकानदारांचा संभ्रम अन् प्रशासनाची सक्ती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:24 AM2021-04-08T04:24:07+5:302021-04-08T04:24:07+5:30
कोल्हापूर : दिवसा जमावबंदी असली तरी दुकाने सुरू ठेवायची की बंद, याबाबतचा शहरातील व्यापारी, दुकानदारांचा संभ्रम बुधवारीही कायम राहिला. ...
कोल्हापूर : दिवसा जमावबंदी असली तरी दुकाने सुरू ठेवायची की बंद, याबाबतचा शहरातील व्यापारी, दुकानदारांचा संभ्रम बुधवारीही कायम राहिला. त्यामुळे सकाळी उघडलेली दुकाने महापालिका प्रशासनाने लागलीच सक्तीने बंद पाडली. दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यावरील पन्नास टक्क्यांहून अधिक दुकाने बंद होती.
राज्यभर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत चालला असून, राज्य सरकारने यापूर्वी घातलेले निर्बंध अधिक कडक केले आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदी म्हणजे पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंधने आली आहेत. परंतु, बाजारपेठेत हे बंधन पाळले जात नाही. त्यामुळे जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
परंतु, राज्य सरकारच्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही दुकाने सुरूच ठेवणार, असा निर्धार त्यांनी केला आहे. मंगळवारी त्यांचा हा निर्धार पोलिसांनी हाणून पाडला होता. सकाळी सुरू झालेली दुकाने दुपारी पोलिसांनी संचलन करून बंद ठेवण्यास भाग पाडले.
त्यानंतर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली. बुधवारी सकाळीसुद्धा पालकमंत्र्यांना तशी विनंती करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवदेन द्या, असे सुचविले. त्यानुसार निवेदन देण्यात आले. तुमची भावना राज्याच्या मुख्य सचिवांच्या कानावर घालतो, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
कोल्हापुरात बंदसदृश स्थिती-
बुधवारी सकाळी दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळेल या संभ्रमात दुकानदार, व्यापारी होते. पण तशी परवानगी मिळाली नाही. सकाळी त्यांनी आपली दुकाने नेहमीप्रमाणे उघडली. मात्र, महापालिकेचे अधिकारी सचिन जाधव, पंडितराव पोवार यांनी शहरातील महाद्वार, ताराबाई रोड, पापाची तिकटी, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी परिसरात जाऊन दुकाने बंद करण्यास भाग पाडले. राजारामपुरीत सर्वच दुकाने उघडली होती. ती बंद करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता जवळपास निम्म्याहून अधिक शहरातील सर्व प्रकारची दुकाने बंद होती. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी दिसत होती.
भाजी मंडई, धान्य बाजारात गर्दी-
पुन्हा लॉकडाऊन होईल, या भीतीने नागरिकांनी भाजी मंडई, धान्य बाजार, किराणा दुकानातून गर्दी केल्याचे पहायला मिळाले. लक्ष्मीपुरी परिसर गजबजलेला होता. भाजी, धान्य, फळ मार्केट असल्याने तेथे खरेदीसाठी गर्दी झाली होती.
ही दुकाने बंद आहेत-
शहरातील इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कापड, भांडी, स्टेशनरी, सराफ आदी व्यावसायिक दुकाने बंद होती. हॉटेल, रेस्टॉरंट बंद होती. मात्र, त्यांना पार्सलची मुभा देण्यात आली आहे.
-दारू दुकाने बंद, परमिट रूमना पार्सल परवानगी
शहरातील दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, त्याच वेळी परमिट रूमना पार्सल देण्याची मुभा देण्यात आली आहे. एकीकडे दारूच्या दुकानात गर्दी टाळण्यासाठी परमिट रूमच्या दारातील गर्दी वाढविली आहे. परमिट रूमचालक पार्सल देताना जादा दराने विक्री करून ग्राहकांना लुबाडत असल्याच्या तक्रारी आहेत.
दोन दिवसांत निर्णय अपेक्षित-
राज्य पातळीवर व्यापारी संघटनांचा होत असलेला विरोध लक्षात घेता येत्या दोन दिवसांत काही सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात येते. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील व्यापारी संघटना प्रतिनिधींशी दूरभाष्य संवाद प्रणालीद्वारे चर्चा केली. तसेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव कुंटे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.