‘स्वाभिमानी’चा साखर सहसंचालकमध्ये गोंधळ

By admin | Published: December 13, 2014 12:20 AM2014-12-13T00:20:52+5:302014-12-13T00:27:43+5:30

ऊस दरप्रश्नी आंदोलन : वाय. व्ही. सुर्वे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार; बेकायदेशीर हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी

Confusion of 'Swabhimani' Joint Director Joint Director | ‘स्वाभिमानी’चा साखर सहसंचालकमध्ये गोंधळ

‘स्वाभिमानी’चा साखर सहसंचालकमध्ये गोंधळ

Next

कोल्हापूर : बेकायदेशीरपणे हंगाम चालू करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई का केली नाही? अशी विचारणा करत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात आज, शुक्रवारी गोंधळ घातला. संतप्त कार्यकर्त्यांकडून एकेरीची भाषा वापरत सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी जादा कुमक मागविली. त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले. कारवाईबाबत लेखी पत्र मिळाल्याने आंदोलकांचा पारा कमी झाला.
या गळीत हंगामात १७ साखर कारखाने चालू होऊन एक महिना झाला असून, त्यापैकी शाहू, पंचगंगा, गुरुदत्त शुगर्स, दालमिया शुगर्स या कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केलेली आहे. दालमिया, पंचगंगा व गुरुदत्त यांनी १४ दिवस झाल्यावर पहिली उचल जाहीर केलेली आहे. वास्तविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल २७०० रुपये मागितली आहे.
शुगरकेन अ‍ॅक्टनुसार ऊस उत्पादकांना ऊस तुटल्यापासून १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे बंधनकारक आहे. त्यासाठी या कार्यालयाकडून फक्त ८ डिसेंबरला कोल्हापूर जिल्ह्णातील १२ व सांगली जिल्ह्यातील ५ कारखान्यांना कारवाईची नोटीस पाठवून दिखावूपणा केला आहे.
त्याचबरोबर गेल्या गळीत हंगामातील अंतिम बिल अदा न करताच साखर कारखान्यांना गाळपास परवानगी दिली आहे. त्याचा खुलासा करणे गरजेचे आहे. यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळ आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मीपुरी येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. यानंतर घोषणाबाजी करतच कार्यकर्ते कार्यालयात आले. या ठिकाणी वाय. व्ही. सुर्वे यांची भेट घेऊन चर्चा सुरू झाली.
यावेळी सदाभाऊ खोत यांनी वसंतदादा साखर कारखान्याने उसाचा एकही हप्ता दिलेला नाही. तरीही त्यांच्यावर कारवाई केली नाही? अशी विचारणा केली. जर तुम्ही या कारखान्यावर कारवाई करायला वर्षभर लावत असाल तर ‘एफआरपी’ न दिलेल्या उरलेल्या कारखान्यांवर तुम्ही कारवाई कराल यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? असे सांगितले. तुम्ही कारवाई केल्याशिवाय आम्ही येथून बाहेर जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावर, आपल्या हातात कारवाईचे अधिकार नसून ते आयुक्तांना आहेत, असे सुर्वे यांनी सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या खोत यांनी कारवाईचे अधिकार जर तुमच्या हातात नसेल तर तुम्ही कार्यालयाबाहेर जावा. तुमचे इथे काय काम? आम्ही कार्यालयाला टाळे ठोकतो. वरून कारवाई झाल्यावरच कार्यालय उघडायचे, अशा शब्दांत सुनावले.
या आक्रमक पवित्र्यावर सुर्वे यांनी तातडीने साखर आयुक्तांना फोन लावला; पण ते नागपुरात असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. निर्णय झाल्याशिवाय बाहेर पडणार नसल्याच्या भूमिकेमुळे सुर्वे यांनी पुणे येथे साखर संचालक (प्रशासन) किशोर तोष्णीवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
त्यांच्या निर्देशानुसार आंदोलकांना कारवाईचे लेखी पत्र दिल्याने आंदोलकांनी संयमाची भूमिका घेतली. परंतु, येत्या सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास न कळविता आपल्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, जि. प. सदस्य सावकार मादनाईक, श्रीकांत घाटगे, चंद्रकांत चौगुले, जयकुमार कोले, स्वस्तिक पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

अध्यक्षांवर फौजदारी दाखल करा
आक्रमक कार्यकर्त्यांनी आजच्या आज साखर कारखान्यांच्या अध्यक्षांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, त्या शिवाय आम्ही येथून बाहेर पडणार नाही. जर तुम्ही कारवाई करणार नसाल तर तुम्ही बाहेर व्हा. आम्ही कार्यालयाला टाळे ठोकतो, असे सांगून वाय. व्ही. सुर्वे यांना हातातील कुलूप यावेळी दाखविले. यावेळी हातवारे करून संतप्त भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे सुर्वे यांच्या दालनात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.


सात दिवसांत कारवाईचे लेखी पत्र
या हंगामात ‘एफआरपी’नुसार १४ दिवसांच्या आत ऊस बिल न देणाऱ्या कारखान्यांवर, त्याचबरोबर परवाना न घेता गाळप हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांवर व ज्या साखर कारखान्यांनी गत हंगामातील उसाचे अंतिम बिल दिलेले नाही, त्यांच्यावर सात दिवसांत दंडात्मक व फौजदारी कारवाईचे लेखी पत्र सुर्वे यांनी सदाभाऊ खोत व शिष्टमंडळाला दिले.


बेकायदेशीरपणे हंगाम चालू करणाऱ्या कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या दारात निदर्शने केली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक, श्रीकांत घाटगे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुसऱ्या छायाचित्रात प्रादेशिक साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांची चर्चा सुरू असताना काही आक्रमक कार्यकर्त्यांकडून सुर्वे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

Web Title: Confusion of 'Swabhimani' Joint Director Joint Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.