शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्यावरून शिक्षकांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:52+5:302021-03-04T04:43:52+5:30
कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज जमा करा, म्हणून सातत्याने आवाहन करून देखील न फिरकलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांनी शेवटच्या दिवशी मात्र ...
कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज जमा करा, म्हणून सातत्याने आवाहन करून देखील न फिरकलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांनी शेवटच्या दिवशी मात्र अचानक गर्दी करून संपूर्ण यंत्रणेला मंगळवारी वेठीस धरले. शहरातील स. म. लोहिया विद्यालयातील केंद्रावर गोंधळ घातला. अखेर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी प्रस्ताव स्वीकारत आहे, पण पुढे असे चालणार नाही, अशी समज दिल्यानंतर गोंधळ थांबला.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती प्रस्ताव भरण्यासाठीची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू आहे. दि. १५ फेब्रुवारीपर्यंत कॅम्प घेऊन देखील शिक्षक उदासीन असल्याने अखेर समाजकल्याणकडून कारवाईचा इशाराही देण्यात आला होता, शिवाय गेल्या पाच दिवसांपासून विशेष कॅम्पही आयोजित केले होते. मंगळवारी त्याचा शेवटचा दिवस होता. यासाठी करवीर तालुक्यातील ४०० शिक्षकांना बोलावण्यात आले होते. पण अखेरचा दिवस असल्याने अर्ज स्वीकारणे बंद होईल, म्हणून राधानगरी, शिरोळमधील २०० शिक्षकही येथे आले. याशिवाय प्रस्तावात त्रुटी घेऊनही काही शिक्षक आले. एकाचवेळी ६०० ते ७०० शिक्षक जमल्याने तेथील नियोजन कोलमडले. यावरून उपस्थित शिक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी तेथे धाव घेत, सर्व अर्ज स्वीकारत असल्याचे सांगितले. त्यासह येथून पुढे असा उशीर आणि गोंधळ घालून यंत्रणेला वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दात समज दिली.
फोटो: समाज कल्याण या नावाने सेंड करते
फोटो ओळ:
समाजकल्याण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती कॅम्पमध्ये शिक्षकांनी गोंधळ घातला.