उदगाव ग्रामपंचायतीचा सावळागोंधळ संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:23 AM2021-03-19T04:23:05+5:302021-03-19T04:23:05+5:30
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच निवडी होऊन महिना होत आला तरी पदाधिकारी व अधिकारी यांचा ...
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच निवडी होऊन महिना होत आला तरी पदाधिकारी व अधिकारी यांचा सावळागोंधळ सावरत नसल्याचे दिसून येत आहे. सदस्यांमध्ये एकवाक्यता नसल्याने दैनंदिन उपाययोजना राबविताना अधिकाऱ्यांना नाकीनऊ आले आहे. वास्तविक नव्या सभागृहाला विकासासाठी एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे.
गावामध्ये सात कोटींची पेयजल योजना सुरू आहे. त्यावरून वाद उमटत आहेत.
पेयजलचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर दगडफेक झाली. भंगार साहित्याचा लिलावही एका पत्रामुळे पुढे ढकलण्यात आला; तर ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यामध्ये समन्वय नसल्याने जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती यांचा निधीदेखील दुसरीकडे लावण्याची वेळ आली. अशा आडमुठ्या भूमिकेने नागरिकांत नाराजी उमटत आहे.
गुरुवारी पेयजलसंबंधी शाखा अभियंता सुनील लिमये यांच्यासोबत सरपंच कलिमुन नदाफ व सदस्यांची बैठक झाली. त्यामध्ये सदस्य अरुण कोळी, सलीम पेंढारी व लिमये यांच्यात शाब्दिक चकमक झाली; तर पेयजल योजनेच्या वीजजोडणीसाठी मदत करणार नसल्याची भूमिका ग्रामपंचायतीने घेतली. दरम्यान, पेयजलच्या वीजजोडणीसाठी ग्रामपंचायतीला लेखी पत्र देणार असून, यावर ग्रामपंचायतीने पुढील निर्णय घ्यावा, असे लिमये यांनी सांगितले.
------------------
चौकट - जॅकवेलच्या गट नंबरमध्ये तफावत
पेयजल योजनेच्या कामासाठी जॅकवेलचे गट नं. १५४१ च्या जागेत बांधकाम केले आहे; तर दस्तनोंदणी गट नं. १५३९ मध्ये केली आहे. त्यावर पुढे चूक दुरुस्तीची प्रक्रिया सरपंच, उपसरपंच व सदस्यांकडून दिसून येत नाही.