शहापुरात लस केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:17 AM2021-06-10T04:17:18+5:302021-06-10T04:17:18+5:30
इचलकरंजी : येथील शहापूर आरोग्य केंद्रातील कोरोना लसीकरणातील मनमानीच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी अचानक पाहणी केली. त्यामध्ये लसीच्या वाईलपेक्षा २ ...
इचलकरंजी : येथील शहापूर आरोग्य केंद्रातील कोरोना लसीकरणातील मनमानीच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी अचानक पाहणी केली. त्यामध्ये लसीच्या वाईलपेक्षा २ वाईल अधिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे केंद्रातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरत त्या रिकाम्या वाईल कोठून आल्या, असा सवाल करत प्रश्नांचा भडीमार केला. सुमारे २ तासांच्या या गोंधळामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.
शहापूर आरोग्य केंद्रात येणाऱ्या लसी परस्पर बाहेर जातात, पैसे घेऊन लसीकरण केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नगरसेवक किसन शिंदे, रणजित अनुसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केंद्रावर पाहणी केली असता लसीकरणासाठी आलेल्या वाईलपेक्षा दोन रिकाम्या वाईल अधिक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन वाईल परस्पर देऊन त्याठिकाणी रिकाम्या वाईल कोणी आणून ठेवल्या, यासह विविध प्रश्न उपस्थित केले. संबंधित कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याने केंद्रप्रमुखांना पाचारण करण्यात आले.
तणाव वाढल्याने लोकप्रतिनिधींनी मुख्याधिकारी आणि आरोग्य अधिकाºयांशी संपर्क साधला. त्यामुळे केंद्रप्रमुख दाखल झाले. त्यांनीही घडल्या प्रकाराबाबत कर्मचाºयांकडून माहिती घेतली आणि परस्पर लसीकरण केले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, आलेल्या वाईलपेक्षा २ वाईल कोठून आल्या, यावर कोणीच उत्तर देत नव्हते. त्यामुळे नगरसेवक शिंदे यांनी केंद्रातील ही मनमानी रोखण्यासाठी दोषींवर कारवाईची मागणी केली. या गोंधळाची माहिती समजताच शहापूरचे पोलीसही दाखल झाले होते. अखेर केंद्रप्रमुखांनी पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे स्पष्टीकरण दिल्याने गोंधळ निवळला.