किणी टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:45 AM2021-03-04T04:45:33+5:302021-03-04T04:45:33+5:30
किणी : राष्ट्रीय महामार्गावर प्रवासासाठी वाहनधारकांना टोल नाक्यावर पंधरा दिवसांपूर्वी फास्टॅगची सक्ती केली असून किणी (ता. हातकणंगले ...
किणी : राष्ट्रीय महामार्गावर प्रवासासाठी वाहनधारकांना टोल नाक्यावर पंधरा दिवसांपूर्वी फास्टॅगची सक्ती केली असून किणी (ता. हातकणंगले ) येथील टोल नाक्यावर फास्टॅग नसनाऱ्या वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागत असल्याने आर्थिक भुर्दड सोसावा लागत आहे. मात्र फास्टॅग वाहनांची संख्या वाढत असल्याने टोलनाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहावयाला मिळत आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या धोरणानुसार महामार्गावरील टोल नाक्यावरील गर्दी कमी होऊन वेळेची व वाहनधारकांची इंधन बचत व्हावी, यासाठी रोखीने टोल वसूल न करता फास्टॅग प्रणालीद्वारे ऑनलाईन टोल वसुलीच्या निर्णयाची अंमलबजावणी करून पंधरा दिवसांपूर्वी वाहनधारकांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे.
विना फास्टॅग वाहनधारकांना दुप्पट टोल आकारला जात असल्याने वाहनधारकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. महामार्गावर प्रवास करणाऱ्या कार, जीपसारख्या जवळपास ८० ते ८५ टक्के वाहनधारकांनी तर ट्रक, बससह अन्य व्यावसायिक वाहनधारकांनी सुमारे ८५ ते ९० टक्के फास्टॅगची सिस्टिम बसवून घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच आजही सुमारे १५ ते २० टक्के वाहनधारकांनी फास्टॅग बसवली नसल्यामुळे त्या वाहनधारकांना दुप्पट टोल आकारला जात आहे. सर्व बुथवर फास्टॅगची सिस्टिम लागू केली आहे. मात्र फास्टॅग ॲक्टिव्ह नसेल किंवा पुरेसा बॅलन्स नसल्यामुळे किंवा स्कॅन नाही, अशा तांत्रिक अडचणी आल्यास वाहन खोळंबते. फास्टॅगसाठी मुदतवाढ देण्यात आली नसल्यामुळे फास्टॅग बसवून घेणाऱ्या वाहनधारकांची संख्या वाढत आहे. गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
वाहनधारकांनी फास्टॅगची सिस्टिम बसवून घ्यावी, तसेच पुरेसा बॅलन्स ठेवावा व टोलनाक्यावर येण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी बॅलन्स करावा, फास्टॅग स्कॅन होण्यासाठी अडचणी येणार नाहीत, असे आवाहन व्यवस्थापक प्रताप भोईटे यांनी केले आहे.
फोटो ओळी .
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी येथील टोलनाक्यावर फास्टॅग बसविलेली वाहने वाढल्याने गर्दी कमी झाल्याचे चित्र मिळत आहे.( छाया : संतोष भोसले)