हद्दवाढीसाठी गावांची मनधरणी करणार

By Admin | Published: May 26, 2015 01:05 AM2015-05-26T01:05:07+5:302015-05-26T01:07:45+5:30

शनिवारी पालिकेत कार्यशाळा : हद्दवाढीसाठी प्रशासनाचे युद्धस्तरावर प्रयत्न

Congratulation of the villages for multiplication | हद्दवाढीसाठी गावांची मनधरणी करणार

हद्दवाढीसाठी गावांची मनधरणी करणार

googlenewsNext

कोल्हापूर : राज्य शासनास हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव पाठविण्याची तयारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी केली आहे. प्रस्तावित २० गावांतील सरपंचांसह राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची कार्यशाळा शनिवारी (दि. ३०) महापालिकेत घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सोमवारी ‘लोकमत’ला सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरची हद्दवाढ करण्यास उत्सुक असल्याचे संकेत रविवारी कोल्हापूर दौऱ्या दरम्यान दिले होते.
कोल्हापूरच्या हद्दवाढीस राजकीय विरोध होत असल्याने हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याचे पत्र नगरविकास मंत्रालयाने महापालिकेस पाठविले. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न शासनस्तरावर निकाली निघाल्याची तीव्र व संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांतून उमठली. दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरालगतच्या एक ते पाच किलोमीटर परिघामध्ये असणाऱ्या गावांच्या हद्दवाढीचा समावेश करण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली. दरम्यान, आॅक्टोबर महिन्यांत होणारी महापालिकेची निवडणूक ‘कॅश’ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा हद्दवाढीचे गाजर शहरवासीयांसमोर ठेवले आहे. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव आल्यास तत्काळ मंजूरी देऊ, असे आश्वासन दिले. त्यामुळे मनपा प्रशासन पुन्हा जोमाने कामास लागले आहे.
गेली तीस वर्षे रखडलेली कोल्हापूरची हद्दवाढ होणार किंवा नाही, झाल्यास किती गावे समाविष्ट होणार, संभाव्य गावांची समजूत कशी काढणार,असे अनेक प्रश्न शहरवासीयांत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनास हद्दवाढीचा पुनर्प्रस्ताव सादर करण्याची तयारी मनपा प्रशासनाने सुरू केली आहे. ३० मे रोजी नव्याने प्रस्तावित २० गावांतील ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख नागरिकांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये हद्दवाढीचे फायदे समजावून सांगणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.
राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच हद्दवाढीला पुन्हा ‘खो’ बसला. शहरालगतच्या गावांना महानगरपालिकेच्या सोईसुविधा पाहिजेत; परंतु शहरात यायला त्यांचा विरोध आहे. केंद्र शासनाची प्रस्तावित ‘स्मार्ट सिटी’ या संकल्पनेत कोल्हापूरची निवड करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. स्मार्ट सिटीसाठी आवश्यक निकष अद्याप जाहीर झालेले नाहीत. मात्र, लोकंसख्या हा महत्त्वाचा घटक असणार आहे. यासाठी स्मार्ट सिटीसह संभावित हद्दवाढीचे शहरासह या गावांना होणारे फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार आहे.


प्रस्तावित २० गावांची ३० मे रोजी कार्यशाळा घेऊन संभाव्य गावांत हद्दवाढीबाबत असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यशाळेद्वारे हद्दवाढीमुळे होणारे फायदे समजावून सांगू. जून महिन्यात होणाऱ्या महासभेच्या मंजुरीसाठी हद्दवाढीचा प्रस्ताव ठेवला जाईल. यानंतर प्रस्ताव शासनास सादर होईल.
- पी. शिवशंकर मनपा आयुक्त

Web Title: Congratulation of the villages for multiplication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.