वाहन नोंदणी सुलभ केल्याबद्दल सतेज पाटील यांचे अभिनंदन : काडाने केला ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:42+5:302021-07-14T04:26:42+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने वाहन वितरकांसाठी वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ व सुटसुटीत केली आहे. याबद्दल कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स ...
कोल्हापूर : राज्य शासनाने वाहन वितरकांसाठी वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ व सुटसुटीत केली आहे. याबद्दल कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (काडा) तर्फे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांचे सोमवारी अभिनंदन करण्यात आले. त्यांच्यासह परिवहन मंत्री व आयुक्तांच्या अभिनंदनाचा ठराव त्यांच्याकडे असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सुपूर्द केला.
राज्य शासनाने परिवहन विभागाच्यावतीने परिवहन खात्यामध्ये अलीकडेच अमूलाग्र बदल केले आहेत. त्यामुळे आता वाहनांचे पासिंग हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे. यात ग्राहकाने खरेदी केलेल्या वाहनांचे पेपर्स पोर्टलवर लोड करून त्याचदिवशी पासिंगही केले जाते. लगेचच संबंधित वाहनाचा कर भरणा करून वाहनाची नोंदणी अत्यंत कमी वेळेत होत आहे. ग्राहकांना पासिंगच्यादिवशीच वाहनाचा नंबर दिला जातो. दुसऱ्यादिवशी ‘एचएससारपी’ नंबर प्लेटही परिवहन खात्याकडून दिली जाते. यामुळे वाहन वितरकांसाठी वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ व सुटसुटीत झाली आहे. ग्राहकांनाही याचा मोठा फायदा होत आहे. ही प्रक्रिया सुलभ केल्याबद्दल कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्री व परिवहन आयुक्त यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. हा ठराव असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, तेज घाटगे, विशाल चोरडिया, रत्नाकर बांदिवडेकर व प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस उपस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
फोटो : १२०७२०२१-कोल-काडा
ओळी : वाहन नोंदणी प्रक्रिया सुलभ केल्याबद्दल परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांचे कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनतर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, तेज घाटगे, विशाल चोरडिया, रत्नाकर बांदिवडेकर व प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिस उपस्थित होते.