राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल जिल्हा परिषदेचे अभिनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:36 AM2019-06-22T11:36:02+5:302019-06-22T11:41:51+5:30
‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल शुक्रवारी जिल्हा परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सोमवारी (दि. २४) दिल्ली येथील विज्ञान भवन येथे होणाऱ्या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल शुक्रवारी जिल्हा परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सोमवारी (दि. २४) दिल्ली येथील विज्ञान भवन येथे होणाऱ्या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे हे उद्या, रविवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. या तिघांसमवेत पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय पाटील, सावर्डे दुमाला गावच्या सरपंच सुवर्णा कारंडे, शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळेच्या सरपंच सुनीता पाटील, गडहिंग्लजचे स्वच्छताग्रही सिद्धाप्पा करिगार, राधानगरीचे स्वच्छताग्रही रोहित भंडारी हेही या पुरस्कार स्वीकारण्याच्या समारंभाला दिल्ली येथे उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या या यशाबद्दल पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज एकमेकांचे अभिनंदन केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सर्वांनीच घेतलेल्या कष्टांना चांगली पोहोचपावती मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
शिक्षक संघाचे नेते राजाराम वरुटे, जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, सतीश बरगे, मोहन भोसले यांनी शुक्रवारी अमन मित्तल यांची भेट घेऊन त्यांचे शिष्यवृत्ती आणि स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेतील यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच ग्रामसेवक संघटनेच्या वतीनेही मित्तल यांचे अभिनंदन करण्यात आले.
पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांचेही अनेकांनी अभिनंदन केले.