जातींच्या नावाचे महासंघ निषेधार्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:56 AM2018-04-30T00:56:27+5:302018-04-30T00:56:27+5:30
कोल्हापूर : अलीकडे ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित या जातींच्या नावाने स्थापन झालेले महासंघ हे निषेधार्हच म्हणावे लागतील. यामधून जातीयवाद निकाली निघणार की वाढणार हा प्रश्न उपस्थित होतो, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित आठव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती लेखक डॉ. आनंद पाटील, कार्याध्यक्ष डॉ. जे. बी. शिंदे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई, साहित्यिक लक्ष्मणराव मोहिते, व्यंकाप्पा भोसले, मीरासाहेब मगदूम, प्राचार्य दिनकर खाबडे, डॉ. टी. एस. पाटील, सुनीलकुमार सरनाईक, हसन देसाई, पी. बी. पवार, आदींची होती. डॉ. आनंद पाटील यांच्याहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले.
सबनीस म्हणाले, अलीकडे देशाला हिंदुत्ववादाचा धोका निर्माण झाला आहे का?, सर्वच जाती-धर्मांत कट्टरवाद आला आहे का?, भारताची व महाराष्टÑाची सांस्कृतिक एकात्मता धोक्यात आली आहे का? हे पाहण्याची वेळ आली आहे. डॉ. आनंद पाटील म्हणाले, लहानपणापासूनच मुलांवर बाराखडीमधून वर्णव्यवस्था बिंबवली जात आहे. समानतेसाठी विविध देशांत क्रांती झाली पण भारतात होऊ शकली नाही, कारण इथे कोणाला वैदिक चौकट पार करता आली नाही. जे. बी. शिंदे म्हणाले, बुद्धांच्या मानवतावादी विचारांच्या मनन, चिंतन व अनुकरणासाठी गेली आठ वर्षे हे संमेलन आयोजित केले जात आहे. देसाई, मोहिते, प्रा. शिंदे यांनी विचार मांडले. राजेंद्र यादव यांनी सूत्रसंचालन, विशाखा जितकर यांनी आभार मानले.
शासकीय पुजारी नियुक्तीचा अभिनंदनपर ठराव
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नियुक्त करण्याचा कायदा सरकारने मंजूर केला. यासाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याचबरोबर हाच कायदा महाराष्टÑातील इतर मठ व मंदिरांना लागू करून जमलेल्या पैशांतून समाजहिताची कामे करावीत यासह विविध आठ ठराव जे. बी. शिंदे यांनी मांडले. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
यांचा झाला गौरव
संमेलनात डॉ. जयश्री चव्हाण, गुलाब अत्तार, अशोक चौगुले, बाबूराव शिरसाट यांचा प्रबोधन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.