शेतकरी आंदोलनात कॉँग्रेस कार्यकर्ते ताकदीने उतरणार
By admin | Published: June 10, 2017 06:01 PM2017-06-10T18:01:30+5:302017-06-10T18:01:30+5:30
गाव पातळीवर सरकार विरोधात रान उठवा ; प्रदेशाध्यक्षांचे आवाहन
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १0 : सात/बारा कोरा करा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून त्यांच्या आंदोलनात कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी ताकदीने उतरावे, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे. गाव पातळीवर आंदोलन तीव्र करून सरकार विरोधात रान उठवण्याचे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी १ जून पासून शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. संपुर्ण राज्यात सरकार विरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. कॉँग्रेसने यापुर्वीच कर्जमाफीसाठी राज्यभर संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. शेतकरी संपासही यापुर्वीच पाठींबा दिला असून सर्व जिल्हाध्यक्षांना आंदोलनात सक्रीय सहभागी होण्याबाबत सूचना केल्या आहेत.
शेतकरी सोमवार (दि. १२) पासून राज्यात तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, रेल रोको आंदोलन करणार आहे. या आंदोलनात कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या शेतकरी आंदोलनात तालुकाध्यक्ष, सेलचे पदाधिकारी, युवक, विद्यार्थी, महिला कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे. कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून विरोध दर्शवावा, असे आवाहन प्रदेश कॉँग्रेसचे चिटणीस तौफिक मुल्लाणी यांनी पत्रकातून केले आहे.
उच्चाधिकार समितीसोबत चर्चा नकोच
ज्यांना ‘स्वामिनाथन’ माहिती नाहीत, अशा चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुढे केली आहे. मुळात या समितीला काडीचाही अधिकार नसल्याने त्यांच्याशी चर्चा करणे म्हणजे वेळ फुकट घालवणे आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा न करता संपुर्ण मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेऊ नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील यांनी पत्रकातून केले आहे.
भाजीपाल्याची आवक वाढली
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असून शनिवारी २६०० क्विंटल आवक झाली. फळे ६५० तर कांदा ९३०० व बटाटा १८५० क्विंटलची आवक झाली आहे. आवक बऱ्यापैकी असल्याने दरही स्थिर होण्यास सुरूवात झाली आहे.