काँग्रेस-भाजपमध्ये लढत
By admin | Published: October 25, 2016 12:33 AM2016-10-25T00:33:32+5:302016-10-25T01:13:40+5:30
इचलकरंजी नगरपालिका : मित्रगट-आघाड्यांशी जागा वाटपाबाबत कोंडी
इचलकरंजी : नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय कॉँग्रेस व भाजप यांच्यातच लढत होणार असली तरी त्यांच्याशी समझोता करणारे अन्य पक्ष व आघाड्यांच्या जागा वाटपांमध्ये कमालीची कोंडी निर्माण झाली आहे. सोमवारी रात्री कॉँग्रेस व राष्ट्रवादी आणि ‘शविआ’ व मॅँचेस्टर आघाडी यांच्यातील रात्री उशिरापर्यंत जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू होत्या.
नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील कारंडे व जांभळे हे दोन्ही गट एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जाण्यावर एकमत झाले आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या ६२ जागांपैकी कॉँग्रेस ४० आणि राष्ट्रवादीतील दोन्ही गटाला २० ते २२ जागा असा सर्वसाधारण फॉर्म्युला ठरला आहे; पण कॉँग्रेस पक्षाकडे असलेले इच्छुक आणि राष्ट्रवादीतील दोन्ही गटांकडून होणारी मागणी, यामध्ये काही प्रभागात अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा अडचणींची सोडवणूक करण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील कारंडे गट यांच्यातील प्रमुखांची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे, कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव विठ्ठल चोपडे, स्वप्निल आवाडे, कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष अशोकराव औरगे, आदी उपस्थित होते.
सोमवारी दुपारी कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गट यांची बैठक झाली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी सुमारे बारा जागांचा आग्रह धरला असल्याचे समजते. त्यांच्याकडील प्राधान्यक्रमाने प्रभागांबाबत चर्चा झाली. सायंकाळी कारंडे गटाबरोबर बैठक घेऊन आज, मंगळवारी पुन्हा जांभळे यांच्याबरोबर वाटाघाटी करण्याच ठरले आणि ही बैठक सायंकाळी साडेपाच वाजता संपली.
इकडे भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्यात ३१ अशा जागा वाटपाचा फॉर्म्युला मागील आठवड्यात ठरल्याची घोषणा आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली होती. त्यानंतर मॅँचेस्टर आघाडीने ‘शविआ’शी समझोता केला. मॅँचेस्टर आघाडीनेही सुमारे १२ जागा मागितल्या आहेत. भाजप, ‘शविआ’ व मॅँचेस्टर आघाडी यांच्यामध्ये काही इच्छुकांनी समान प्रभागांची मागणी केल्याने तेथेही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांच्यात चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या, तरी सन्मानीय तोडगा निघत नसल्याने जागा वाटप लांबणीवर पडत आहे.
निवडणूक कॉँग्रेस विरुद्ध भाजप अशी दिसत असली तरी समझोता करणारे पक्ष-गट-आघाड्यांतील जागा वाटपाची गोची निर्माण झाली आहे. अशा स्थितीत दोन्ही बाजूलाही इच्छुक असलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही, तर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार, असे चित्र असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी गुरुवारपर्यंत बोलणी लांबण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आॅफर
शहर विकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे समझोता करण्याची आणि त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची आॅफर दिली असल्याचे सांगण्यात
आले.
त्यासंदर्भात आज, मंगळवारी सकाळी ‘शविआ’, भाजप व ‘स्वाभिमानी’चे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांची बैठक होणार असून, यामध्ये होणाऱ्या निर्णयाची उत्सुकता लागून राहिली आहे.