खानापुरात मराठी मतांच्या विभागणीवर काँग्रेस, भाजपचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:23 PM2018-05-05T23:23:13+5:302018-05-05T23:23:13+5:30

Congress, BJP eye on the division of Marathi votes in Khanpur | खानापुरात मराठी मतांच्या विभागणीवर काँग्रेस, भाजपचा डोळा

खानापुरात मराठी मतांच्या विभागणीवर काँग्रेस, भाजपचा डोळा

Next

समीर देशपांडे ।
बेळगाव: मराठी भाषिकांमध्येच उभी फूट पडल्याने खानापूर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपने या विभागणीवर डोळा ठेवला आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजपमध्येही छुपी आणि थेट बंडखोरी झाल्याने त्यांनाही प्रचंड मेहनत करावी लागत असल्याचे चित्र खानापूर मतदारसंघात आहे.

गेल्या विधानसभेवेळी खानापूर मतदारसंघातून एकीकरण समिती एकसंघ असल्याने अरविंद पाटील विजयी झाले होते. यावेळी मात्र एकीकरण समितीमध्येच उभा दावा निर्माण झाला आहे. आमदार पाटील यांनी निवडून गेल्यानंतर मराठी जनतेच्या भावनांशी प्रतारणा केल्याचा आरोप माजी आमदार दिगंबर पाटील गटाकडून होत आहे. सहा महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या सीमाप्रश्न जागर अभियानावेळी सर्वसामान्य मराठी भाषिकांनी यंदा उमेदवार बदलण्याचा आग्रह धरला. तो आम्ही वरिष्ठांना कळवला, परंतु लोकभावना विचारात न घेता अरविंद पाटील यांची उमेदवारी घोषित केल्याचा आरोप करत तालुका एकीकरण समितीने विलास बेळगावकर यांना उमेदवारी दिली आहे. अनेक ठिकाणी त्यांना निधीही दिला जात आहे.
आमदार अरविंद पाटील हे विकासकामांच्या जोरावर मते मागत आहेत. त्यांनी कामे करताना मराठी, कर्नाटकी असा फारसा भेदभाव केला नाही. तो त्यांच्या पथ्यावर पडू शकतो. पाटील यांनी सत्तेचा उपयोग करत अनेक बडे उपनेतेही आपल्या बाजूने वळवून घेतले आहेत. केवळ पश्चिम भागातील मराठी मतांवरच अवलंबून न राहता त्यांनी पूर्वेकडील कन्नड भाषिकांच्या मतांसाठीही चांगली जोडणी घातली आहे, परंतु याच त्यांच्या कामाच्या पद्धतीचा उलटा प्रचार तालुका समितीकडून होत आहे. बेळगावकर हे सीमावासीयांच्या भावनेला हात घालत आहेत. आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला असता; पण कोल्हापुरातून गडबडीने उमेदवारी जाहीर का केली, असा प्रश्न दिगंबर पाटील यांनी उपस्थित केला आहे.

गत विधानसभेला अपक्ष रिंगणात उतरूनही तिसऱ्या क्रमांकाच्ी मते घेतलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांना यंदा काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. मात्र, त्याबाबतही पक्षातील काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. उस्मानाबाद हे माहेर आणि कोल्हापूर सासर असलेल्या निंबाळकर या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भाची असून, कर्नाटकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. निंबाळकर हे बेळगावला जिल्हा पोलीसप्रमुख असताना मराठी मतदारांची मोठी संख्या असलेल्या खानापूर मतदारसंघावर त्यांची नजर गेली आणि यंदा तर ते पत्नीला काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी ठरले.

जनता दलामध्ये सहा महिन्यांपूर्वी प्रवेश केलेले नासीर बागवान हे देखील यावेळी रिंगणात आहेत. २००८ साली भाजपचे आमदार राहिलेले कै. प्रल्हाद रेमाणी यांचे चिरंजीव ज्योतिबा यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे.

मतदारसंघाचे नाव --: खानापूर - मतदार संख्या : २,०४,६४६गावे आणि वाड्या : २५६, एकूण उमेदवार: १२

खानापूर मतदारसंघातील खानापूरचे मध्यवर्ती एकीकरण समितीचे उमेदवार आमदार अरविंद पाटील यांची नंदगड येथील प्रचारफेरी.

एकी, माघारीसाठी दबाव

बेळगाव : केवळ सहा दिवसांवर मतदान येऊन ठेपले असताना महाराष्ट्र एकीकरण समितीमधील दुहीचा तिढा अद्याप सुटलेला नाही.शनिवारी दुपारी वडगाव, जुने बेळगाव आणि भारतनगर येथील कार्यकर्त्यांनी दबाव तयार केल्याने शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर आणि मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी दोघेही नेते बैठकीस उपस्थित राहिले. दोघांनीही उमेदवार निवडीच्या प्रकियेबाबत माहिती दिली.दीपक दळवी यांनी माघार किंवा निर्णय घेण्याबाबत वरिष्ठांना विचारून घेऊ, अशी भूमिका मांडली. यावेळी काहीनी दोन्ही उमेदवारांना एकत्र बोलवून एकीची प्रक्रिया आणि माघारीबाबत मागणी केली. या बैठकीत कोणताच निर्णय होऊ शकला नाही. मात्र, कार्यकर्ते एकच उमेदवार द्या म्हणून आक्रमक झाले होते.किरण सायनाक आणि प्रकाश मरगाळे आणि दळवी, ठाकूर यांच्या समक्ष पुन्हा एकदा शनिवारी सायंकाळी बैठक होणार आहे.

Web Title: Congress, BJP eye on the division of Marathi votes in Khanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.