काँग्रेस चार्ज, राष्ट्रवादी काँग्रेस डिस्चार्ज
By admin | Published: November 21, 2014 11:29 PM2014-11-21T23:29:37+5:302014-11-22T00:02:58+5:30
सांगलीतील स्थिती : पदे रिक्त, कार्यकर्ते संभ्रमात, नेते राज्याच्या राजकारणात
सांगली : राज्यातील विधानसभेचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसने लगेचच रिक्त असलेल्या जागा भरून जिल्ह्यात विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पावसाने झालेले नुकसान, डेंग्यू असे महत्त्वाचे प्रश्न हाती घेऊन त्यांनी शासकीयदरबारी निवेदने देण्यास सुरुवात केली. दुसरीकडे नेते आणि कार्यकर्त्यांअभावी राष्ट्रवादीचे कार्यालय शांत आहे. रिक्त पदांमुळे महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील पक्षाचा कारभार सध्या ठप्प आहे. त्यामुळे काँग्रेस चार्ज आणि राष्ट्रवादी डिस्चार्ज असे वातावरण आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अर्धा डझन नेते भाजप व शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला. माजी मंत्री आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांमधून नेते घडविण्याचा विडा उचलला. त्यामुळे पक्षात उरलेल्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. कार्यकर्ते खचून दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत, म्हणून हा उतारा होता, की खरेच असे होणार आहे, याबाबत अजूनही पक्षात संभ्रमावस्था आहे. कार्यकर्त्यांमधून नेते घडविण्याच्यादृष्टीने कोणतीही पावले उचलली नाहीत. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील पदेही रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातही राष्ट्रवादीचा कारभार ठप्प झाला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच काँग्रेसने शहर जिल्हाध्यक्षपद भरून पक्षीय कामकाजाला सुरुवात केली. विरोधी पक्ष म्हणून जिल्ह्यात अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर आता सरकारदरबारी निवेदनेही काँग्रेसकडून दिली जात आहेत. राष्ट्रवादीने या कालावधित नागरिकांच्या प्रश्नांवर एकही आंदोलन जिल्हास्तरावर केले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रमावस्था वाढली. पक्षीय कार्यालयात बैठका, कार्यकर्त्यांची चर्चा, नेत्यांच्या भेटीगाठीचे कार्यक्रम, असे कोणतेही चित्र दिसत नाही. आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांचीही पक्षीय कार्यालयातील उपस्थिती कमी झाली आहे.(प्रतिनिधी)
पदांमुळे मोठा फरक
राष्ट्रवादीची महापालिका क्षेत्रातील पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा कार्यालयात सध्या नेतेमंडळी दिसत नाहीत. शहरातील पदाधिकारी किमान दररोज कार्यालयात येत होते. आता पदेच रिक्त असल्याने पक्षीय कार्यालयातील लगबग नाहीशी झाली आहे.