काँग्रेसचा दावा २५२ मतदारांचा

By Admin | Published: December 27, 2015 01:26 AM2015-12-27T01:26:23+5:302015-12-27T01:26:44+5:30

पुण्यात बैठक : नेत्यांची मतदारांशी चर्चा; आज थेट मतदान केंद्रावरच येणार

Congress claims 252 voters | काँग्रेसचा दावा २५२ मतदारांचा

काँग्रेसचा दावा २५२ मतदारांचा

googlenewsNext

कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्याकडे या घडीला ३८२ पैकी २५२ मते असल्याचा दावा काँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाच्यावतीने करण्यात आला. पुण्यातील डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात झालेल्या मतदारांच्या बैठकीस २४७ मतदार उपस्थित होते. उर्वरित पाच सदस्य आजारपणामुळे या बैठकीस
उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत नेत्यांनी काँग्रेसचे
उमेदवार सतेज पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. हे सर्व मतदार आज रविवार पुण्याहून थेट त्या त्या मतदान केंद्रावर येणार आहेत. आज रविवारी बारा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होत आहे.
दरम्यान, विरोधी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांनी त्यांच्या मतदारांना येलूर व कराडमधील हॉटेलमध्ये ठेवले असून त्यांनाही आजच रविवारी थेट मतदानासाठी आणण्यात येणार आहे. महाडिक यांच्याकडूनही चमत्काराचा दावा करण्यात आला असून, काही झाले तरी विजय आमचाच असेल, असे त्यांचेही कार्यकर्ते ठासून सांगत आहेत.
काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचे समर्थक मतदार पुण्यातील तीन आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामास आहेत. शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीस सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी कोणताही दगाफटका न करता पक्षाशी प्रामाणिक राहून सतेज पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या बैठकीस नगरसेवक भूपाल शेटे, विक्रांत माने, मलकापूरचे गोसावी व आवाडे यांचे दोन मतदार रुग्णालयात दाखल असल्यामुळे या बैठकीस उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले.
विधान परिषदेसाठी आज मतदान
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची लढत अजून लांब असली तरी कोल्हापूरच्या राजकारणातील बंदा कोण हे ठरविणारी कोल्हापूर केसरीची लढत आज रविवारी होत आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज, रविवारी जिल्ह्यातील बारा केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Congress claims 252 voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.