‘दुटप्पीं’ना दूर केल्याने काँग्रेसला यश

By admin | Published: November 4, 2015 12:48 AM2015-11-04T00:48:26+5:302015-11-05T00:11:38+5:30

पतंगराव कदम यांचा टोला : महानगरपालिका विजयामुळे काँग्रेसला नवसंजीवनी

Congress cleared away from 'duping' | ‘दुटप्पीं’ना दूर केल्याने काँग्रेसला यश

‘दुटप्पीं’ना दूर केल्याने काँग्रेसला यश

Next

कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील सलग पराभवामुळे खचलेल्या काँग्रेसला महापालिकेच्या विजयामुळे नवसंजीवनी मिळाली. त्याचा भविष्यातील राजकारणासाठी नक्कीच लाभ होईल, असे गौरवोद्गार माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे निरीक्षक पतंगराव कदम यांनी काँग्रेस समिती कार्यालयात झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात काढले. या निवडणुकीत ‘आत एक आणि बाहेर दुसरेच’ करणाऱ्या प्रवृत्तीला पक्षाने दूर ठेवल्यामुळेच हे यश मिळाले, अशी खोचक टिपण्णी कदम यांनी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता केली.
महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मंगळवारी काँग्रेस कार्यालयात कदम यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी ते बोलत होते.
कदम म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात जे घडते ते राज्यात घडते आणि जे राज्यात घडते ते संपूर्ण देशात घडते म्हणून भविष्यातील काँग्रेसच्या राजकारणाला नवीन गती, संजीवनी देण्याचे काम कोल्हापूरच्या जनतेने केले. दररोज आढावा घेत गेलो. तिकीट वाटपसुद्धा सर्व संमतीने झाले म्हणूनच पक्षाला मोठे यश मिळाले. आपल्या पक्षात आपल्याच माणसांना पराभूत करणारी प्रवृत्ती असून हीच काँग्रेसची खरी गंमत आहे; परंतु यंदाच्या मनपा निवडणुकीत अशा प्रवृत्तींना बाजूला ठेवले. ज्यांनी ज्यांनी विरोधात काम केले, त्यांची नावे व घटना लेखी कळवा, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.’
मनपा निवडणुकीत काँग्रेसला २३ टक्के मते मिळाली आहेत. ‘अच्छे दिन’च्या भूलथापांतून जनता बाहेर आल्यामुळे काँग्रेसला चांगले यश मिळाले. हे यश एकट्या सतेज पाटील यांचे नाही तर संयुक्तिक आहे, असे सांगत सतेज पाटील यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता तो टिकविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. प्रत्येक सहा महिन्यांनी प्रभागात ‘जनता दरबार’ घेऊन कामांचा आढावा घेतला जाईल आणि त्यास मी स्वत: उपस्थित राहीन, असेही कदम यांनी सांगितले.
काँग्रेसमधून काही जणांना फोडण्याचा प्रयत्न झाला, पक्षात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉँग्रेस जनतेचा अजेंडा घेऊन मतदारांच्या दारात गेला. प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी दिशा दिली म्हणूनच हे यश मिळाले, असे सतेज पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी स्वागत केले. सरलाताई पाटील यांनी आभार मानले. समारंभास सुरेश कुराडे, ऋतुराज पाटील, संध्या घोटणे, प्रकाश सातपुते आदी उपस्थित होते.

Web Title: Congress cleared away from 'duping'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.