-सांगली जिल्हा परिषदेच्या चौदा गटात काट्याची टक्कर
By admin | Published: February 19, 2017 12:19 AM2017-02-19T00:19:30+5:302017-02-19T00:19:30+5:30
नेत्यांचाही फोकस : व्होट बँक खेचण्यासाठी जोरदार हालचाली
अशोक डोंबाळे--सांगली राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्हा परिषदेच्या चौदा गटातील लढती लक्षवेधी असून, तेथील विजय खेचून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, रयत विकास आघाडीच्या नेत्यांनी फोकस ठेवला आहे. यासाठी भावकी, पै-पाहुणे, जाती-पातीचे राजकीय गणित मांडण्याबरोबरच, छोट्या समाजाची व्होट बँक खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे स्वयंभू नेत्यांचा भाव वधारला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले असल्यामुळे त्यावर डोळा ठेवून दिग्गज मैदानात उतरले आहेत. काहींनी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही जिल्हा परिषद गटातील लढती प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. मांगले (ता. शिराळा), भिलवडी, कुंडल (ता. पलूस), कडेपूर (ता. कडेगाव), नागेवाडी (ता. खानापूर), खरसुंडी (ता. आटपाडी), उमदी (ता. जत), कवलापूर, विसापूर, सावळज, (ता. तासगाव), एरंडोली (ता. मिरज), वाळवा तालुक्यातील बोरगाव, चिकुर्डे, बागणी आदी चौदा जिल्हा परिषद गटामधील लढती अत्यंत चुरशीच्या होत आहेत. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि रयत विकास आघाडीच्या नेत्यांनी येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा घेऊन व्होट बँक खेचण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कवलापूर येथे, तर राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या तासगाव तालुक्यात सभा झाल्या आहेत. काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी जत तालुक्यात नीलेश राणे यांची सभा घेतली होती.
उमदीत कडवी झुंज
उमदी (ता. जत) येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड्. चन्नाप्पा होर्तीकर विरूध्द काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्यात कडवी झुंज आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी होर्तीकरांसाठी प्रचार केला आहे. सावंत यांच्या प्रचाराची सुरूवात काँग्रेसचे युवा नेते नीलेश राणे यांच्या उपस्थितीत झाली आहे. भाजपचे संजय तेली यांनीही दोन्ही काँग्रेस उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे.
पाण्याचा प्रश्न : कवलापुरात पेटला...
कवलापूर गट काँग्रेसचा बालेकिल्ला असून येथे काँग्रेसचे निवास पाटील, राष्ट्रवादीचे भानुदास पाटील, भाजपचे शिवाजी डोंगरे आणि शिवसेनेचे सतीश निळकंठ अशी चौरंगी लढत होत आहे. या मतदार संघात पाच गावे असून ती कृष्णा नदीपासून हाकेच्या अंतरावर आहेत. तरीही तेथे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याच प्रश्नावरून मतदार आता उमेदवारांना जाब विचारत आहेत. पाण्यासाठीचा उद्रेक पाहून उमेदवारांची पंचाईत झाली आहे. काहींनी कूपनलिका खुदाई करून मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. चारही उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, भावकी, पै-पाहुणे आणि बाहेरचा उमेदवार, असे मुद्दे प्रचारात रंगू लागले आहेत.
कुंडलमध्ये आप्पा, भाऊंमध्ये चुरस
कुंडल (ता. पलूस) गटात आ. पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र (आप्पा) लाड (काँग्रेस) व क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांचे पुत्र, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद (भाऊ) लाड (राष्ट्रवादी) अशा दिग्गज नेत्यांमध्ये चुरशीची लढत होत आहे. कदम कुटुंबीयांनी महेंद्रआप्पांचा विजय खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे, तर शरदभाऊंना गुलाल लावायचाच, या निर्धाराने त्यांचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. प्रत्येक मताचे गणित मांडून कार्यकर्ते प्रचाराची रणनीती आखत आहेत.
बागणी (ता. वाळवा) गटात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत (रयत विकास आघाडी) व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे (राष्ट्रवादी) आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे (अपक्ष) असा तिरंगी सामना रंगला आहे. या निवडणुकीत ग्रामीण भागावरील शिंदे घराण्याची पकड किती मजबूत आहे, हे स्पष्ट होणार आहे. याला जयंत पाटील यांचेही पाठबळ आहे. सदाभाऊंची संघटनेच्या रूपाने किती पेरणी झाली आहे, याचाही सोक्षमोक्ष लागणार आहे. सत्ता विकेंद्रीकरणाविरोधात कचरे आवाज उठवत असून, ते मतदारांपर्यंत प्रभावीपणे बाजू मांडत आहेत.
खरसुंडीत तगडी तिरंगी लढत
खरसुंडी (ता. आटपाडी) येथील गटात माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या मदतीने भाजपचे ब्रह्मदेव पडळकर यांच्या माध्यमातून कमळ फुलणार, की काँग्रेसचे नेते मोहनराव भोसले यांचे पुत्र जयदीप भोसले यांना मतदार साथ देणार, याचा नेत्यांना अंदाज आलेला नाही. येथे काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून शिवसेनेचे चंद्रकांत भोसले यांनीही तगडे आव्हान दिल्यामुळे, प्रथमच तिरंगी लढत झाली आहे.
मांगलेत चुलत जावांची कसोटी
मांगले (ता. शिराळा) जि. प. गटातून माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भावजय अश्विनी (राष्ट्रवादी) व जिल्हा परिषदेचे माजी सभापती उदयसिंग नाईक यांच्या स्नुषा अनन्या (भाजप) या दोन जावांमध्ये चुरशीची लढत आहे.