काँग्रेस कमिटीत इच्छुकांची तुडुंब गर्दी
By admin | Published: January 25, 2017 12:35 AM2017-01-25T00:35:34+5:302017-01-25T00:35:34+5:30
जिल्हा परिषद निवडणूक रणांगण : दिवसभरात ६२३ जणांच्या मुलाखती; कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह-- सुपर व्होट
कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीचे कार्यालय मंगळवारी गजबजून गेले. निरीक्षक सदाशिव पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि आ. सतेज पाटील यांनी अन्य नेत्यांसह उपस्थित राहून दिवसभरामध्ये ६२३ जणांच्या मुलाखती घेतल्या. राज्यात सत्ता नसतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी गर्दी केल्याने नेत्यांनाही उत्साह आल्याचे चित्र यानिमित्ताने पाहावयास मिळाले.
सकाळी करवीर तालुक्यापासूनच मुलाखती सुरू झाल्याने दहापासूनच काँग्रेस कमिटीच्या आवारात कार्यकर्त्यांची गर्दी सुरू झाली. निरीक्षक, पी. एन. आणि सतेज पाटील आल्यानंतर थेट मुलाखतींना सुरुवात झाली. करवीर, शिरोळ, हातकणंगले, राधानगरी तालुक्यांतील प्रत्येक जागेसाठी दहा-बाराजण इच्छुक असल्याने एका-एका जिल्हा परिषद मतदारसंघातील इच्छुकांना आत सोडण्याचे नियोजन करावे लागले.
कार्यालयाबाहेर उभारलेल्या मंडपामध्ये कार्यकर्ते बसून होते. इच्छुकांच्या प्रचंड गर्दीमुळे आणि बाराही तालुक्यांच्या मुलाखती संपवायच्या असल्याने नेत्यांना या फाईल पाहण्यास फार वेळ मिळाला नाही. डॉ. साधना हालके यांनी कसबा तारळे पंचायत समितीसाठी उमेदवारी मागितली, तर कसबा वाळवे जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य हिंदुराव चौगुले यांच्या पत्नी रेखा यांनी उमेदवारी मागितली.
करवीर तालुक्यातील सर्वाधिक इच्छुक आज उमेदवारीसाठी उपस्थित होते. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार अशांनीही या मुलाखती देण्यासाठी हजेरी लावली होती. मुलाखतीवेळी निवड समितीमधील माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, भरमूअण्णा पाटील, संजीवनी गायकवाड, नगरसेवक तौकिफ मुल्लाणी, प्रकाश सातपुते, महिला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, उदयानी साळुंखे यांच्यासह विविध तालुक्यांचे नेते उपस्थित होते.
अध्यक्षांच्या मुलाची, तर उपाध्यक्षांच्या पत्नीसाठी मागणी
जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा विमल पाटील या मंगळवार काँग्रेस कमिटीतील मुलाखतीकडे त्या फिरकल्याही नाही; पण त्यांचे सुपुत्र प्रकाश पाटील यांनी शिरोली दुमालातून उमेदवारी मागितली आहे. उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी पत्नींसाठी उजळाईवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून मागणी केली. (प्रतिनिधी)
१ संदीप नरके काँग्रेसचे आहेत काय? : पी. एन.संदीप नरके काँग्रेसमध्ये आहेत काय? आधी प्रवेश करा मगच उमेदवारी मागा, अशा शब्दांत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी नरके समर्थकांना फटकारले. उमेदवारी दिली तर ‘कुंभी’ कारखाना व विधानसभेला कुणाचा प्रचार करणार? असा सवाल केल्याने काँग्रेस कमिटीतील मुलाखतीचे वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले.
२ मंगळवारी काँग्रेस कमिटीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. पहिल्या टप्प्यात करवीर तालुक्यातील मुलाखती सुरू असताना साधारणत: दुपारी साडेबारा वाजता संदीप नरके यांचे धामणी खोऱ्यातील शंभराहून अधिक समर्थक काँग्रेस कमिटीत दाखल झाले. ‘करवीर’मधील मुलाखती सुरू असतानाच त्यांनी माईकचा ताबा घेऊन संदीप नरके यांना कळे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली.
३ या प्रकाराने संतप्त झालेल्या पी. एन. पाटील यांनी समर्थकांना चांगलेच खडसावले. ‘संदीप आले आहेत काय?’ ‘ते कॉँग्रेसमध्ये आहेत काय?’ असा सवाल करत ‘आधी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करायला सांगा, मगच उमेदवारी मागा.’ उमेदवारी दिल्यानंतर कुंभी-कासारी साखर कारखान्यासह विधानसभेला ते कॉँग्रेसचा प्रचार की अन्य कोणाचा? अशा शब्दांत पी. एन. पाटील यांनी कार्यकर्त्यांना फटकारले.
दोनवेळा सभापती, दोनवेळा उपसभापती, आता पुन्हा इच्छुक
हसूर दुमाला पंचायत समिती मतदारसंघातून शहाजी पाटील यांनी मुलाखत दिली. दोनवेळा मी सभापती होतो, दोनवेळा उपसभापती होतो. आता पुन्हा मी इच्छुक आहे, असे त्यांनी सांगताच उपस्थितांना हसू आवरेना.
कागल पंचायत समितीसाठी एकही इच्छुक नाही
बाराही तालुक्यांपैकी करवीर, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले येथे काँग्रेससाठी मोठ्या संख्येने अर्ज आले. मात्र, कागल, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातून खूपच कमी इच्छुक असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. या तालुक्यात काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. कागल तालुक्यात तर काँग्रेसकडे पंचायत समितीसाठी इच्छुकही नसल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले.
निवृत्ती संघात बसून नाव फायनल करा
सडोली खालसा मतदारसंघातील इच्छुकांना सतेज पाटील यांनी बसून एकच नाव ठरविण्याचा सल्ला दिला. करवीर, राधानगरी तालुक्यांतील बहुतांशी सर्वांनीच ‘पी. एन. सांगतील ते फायनल’ अशी भूमिका घेतली.
त्यामुळे तुम्ही वाटल्यास ‘निवृत्ती संघात बसा. खरं एकच नाव ठरवा, म्हणजे पी. एन. साहेबांना सोपं जाईल,’ असं ते इच्छुकांना सांगत होते. ‘परिते मतदारसंघाबाबतही तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकण्यापेक्षा एकत्र बसून एक नाव मला द्या,’ असे पी. एन. यांनी सांगितले. .