काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा ‘पी. एन.’ यांच्याकडेच

By admin | Published: April 17, 2016 12:33 AM2016-04-17T00:33:23+5:302016-04-17T00:33:23+5:30

अशोक चव्हाण यांचे पत्र : २00६ पासून चौथ्यांदा मुदतवाढ

Congress district president again 'P' N. 'by itself | काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा ‘पी. एन.’ यांच्याकडेच

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा ‘पी. एन.’ यांच्याकडेच

Next

कोल्हापूर : राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यावरच सोपविली. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी तसे पत्र पाटील यांना दिले असून २००६ पासून चौथ्यांदा त्यांना ‘प्रभारी’ म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात प्रदेश कार्यकारिणीसह काही जिल्हाध्यक्षांच्या निवडी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केल्या. त्यामध्ये कोल्हापूर शहर व जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय प्रलंबित ठेवला. जिल्हा व शहराध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लावावी, त्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी दि. २१ मार्चला मुंबईत पदाधिकाऱ्यांची मते आजमावली. त्यात इचलकरंजी येथील शिष्टमंडळाने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासाठी तर भरमूअण्णा पाटील, जयवंतराव आवळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, अ‍ॅड. सुरेश कुराडे, बजरंग देसाई, अभिजित तायशेटे आदींनी पी. एन. पाटील यांच्यासाठी आग्रह धरुन त्यांना जिल्हाध्यक्षपदी कायम ठेवले तरच जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता येईल, असे सांगितले.
प्रदेश कार्यकारिणीमध्ये पी. एन. पाटील यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी दिल्याने त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून बाजूला केले जाणार, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कार्यकारिणी निवडीनंतर काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता पसरल्याची दखल घेऊन श्रेष्ठींनी पी. एन. पाटील हेच प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील, असे पत्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मान्यतेने सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी काँग्रेस कमिटीत पाठविले.
जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत कायम राहणार?
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलण्याची शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांना किमान जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत पदावर कायम ठेवण्याची शक्यता आहे.
महाडिक यांच्याशी चर्चा करणार
मालोजीराजे पक्षात पुन्हा आल्याने आमची ताकद वाढली आहे, महादेवराव महाडिक यांच्यासह पक्षावर व माझ्यावर जे कोणी रूसले आहेत, त्यांच्याशी चर्चा करून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मान्यतेने त्यांना पक्षात घेऊन पक्ष बळकट करू, असेही पी. एन. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Congress district president again 'P' N. 'by itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.