कॉँग्रेस आघाडीत ‘एमआयएम’ नसेल: पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:47 PM2018-11-14T23:47:15+5:302018-11-14T23:47:53+5:30
कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, स्वाभिमानी, भारिप, शेकाप, जनता दलासह दहा पक्षांची ...
कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, स्वाभिमानी, भारिप, शेकाप, जनता दलासह दहा पक्षांची महाआघाडी आकारास येत आहे. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आघाडीचे घटक असतील. त्यांनी कुणाशी आघाडी करावी, हा त्यांचा प्रश्न असून, काँग्रेसच्या व्यासपीठावर मात्र ‘एमआयएम’ला स्थान नसेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पृथ्वीराज चव्हाण हे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. कॉँग्रेस कमिटीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण म्हणाले, केंद्र व राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून, ते पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करील, अशी सध्या तरी परिस्थिती नाही.
नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यस्था कोलमडली आहे. अर्थव्यवस्था २.५ टक्क्यांनी घसरल्याने चार लाख कोटींनी देशाच्या उत्पन्नात घट झाली, याला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या संचालक मंडळाची सोमवारी (दि. १९) बैठक आहे. यामध्ये मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.
‘राफेल’मध्ये तर मोदींनी देशाची फसवणूक केली असून, ६७० कोटींचे विमान १६७० कोटींना कसे खरेदी केले? हा भ्रष्टाचार नव्हे काय? भाजपचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे धार्मिक दुहीचा वापर करणार असून राममंदिर, खरे-खोटे हल्ले करणे, शहरांची नावे बदलणे, आदी उद्योग सुरू आहेत; पण एकाच मुद्द्यावर एकदाच यश मिळते. मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असून, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची वाट पाहत असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होणार आहे.
सरकार-रिझर्व्ह बॅँकेत संघर्ष
नोटाबंदीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बॅँकेच्या संचालक मंडळालाही विश्वासात घेतले नाही. अतिशय गुप्त असणारा संचालक मंडळाच्या सभेचा कार्यवृत्तांतही बाहेर आला. रिझर्व्ह बॅँकेकडून केंद्र सरकारने कायदा कलम ७ नुसार हजारो कोटींची गंगाजळी मागितली आहे. रिझर्व्ह बॅँकेची स्वायत्तता धोक्यात आल्याने सरकार व रिझर्व्ह बॅँकेत संघर्ष सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.