राजीनाम्यासाठी कॉँग्रेसचे उपोषण

By admin | Published: March 3, 2015 12:20 AM2015-03-03T00:20:40+5:302015-03-03T00:29:09+5:30

नगरसेवक आक्रमक : माळवींच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरू

Congress fasting for resignation | राजीनाम्यासाठी कॉँग्रेसचे उपोषण

राजीनाम्यासाठी कॉँग्रेसचे उपोषण

Next

कोल्हापूर : महापौरपदाचा राजीनामा द्यावा, हा आदेश धुडकावून लावणाऱ्या महापौर तृप्ती माळवी यांना राष्ट्रवादी पक्षातून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत कायदेशीर अभिप्राय घेण्यात येत असून बुधवारी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या नगरसेवकांच्या बैठकीत त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय होणार आहे. दरम्यान, महापौरांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सभागृहातील काँग्रेसचे सर्व नगरसेवक आज, मंगळवारी महापालिकेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.महापौर माळवी आपल्या पदाचा राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्या आहेत. आता त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येणार आहे. तसा निर्णय पक्षीय पातळीवर रविवारी झाला. परंतु महापालिकेत पक्ष व आघाड्यांची नोंदणी झाली असल्याने काही कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून विधितज्ज्ञांकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते उद्या, मंगळवारी वकिलांशी चर्चा करणार आहेत. बुधवारी सकाळी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली असून, गटनेते राजेश लाटकर यांनी तशी लेखी नोटीस पाठविली आहे. या बैठकीत माळवी यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले जाईल.
महापालिकेतील एखाद्या पक्षाच्या पदाधिकारी किंवा नगरसेवकाविषयी निर्णय घ्यायचा असेल तर तो पालिकेतील आघाडीच्या बैठकीत घ्यावा लागतो. परस्पर शहराध्यक्षांना निर्णय घेता येत नाही, ही कायदेशीर अडचण लक्षात घेऊनच बुधवारी बैठक आयोजित केली आहे, असे लाटकर यांनी सांगितले. वकिलांकडून यासंदर्भात आम्ही माहिती घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, तृप्ती माळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन कोल्हापूर शहराची होत असलेली बदनामी थांबवावी, या मागणीसाठी काँग्रेसचे सर्व नगरसेवक आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती उपमहापौर मोहन गोंजारे यांनी सांगितली. कॉँग्रेसतर्फे ही माहिती माजी मंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना दिली असून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनाही उपोषणात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या जातील, असे मुश्रीफ यांनी सांगीतले आहे.

Web Title: Congress fasting for resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.